esakal | कोरोना नियंत्रणासाठी सिन्नरला ११४ गावांसाठी टास्क फोर्सची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

corona stop

कोरोना नियंत्रणासाठी सिन्नर तालुक्यात टास्क फोर्सची निर्मिती

sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : वाढत्या कोरोना संसर्गाला (corona virus) अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सिन्नर तालुक्यात टास्क फोर्सची (task force) निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ११४ गावांमध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील आणि पोलिस कर्मचारी, तर पालिका क्षेत्रात १४ प्रभागांतील दोन नगरसेवक, पालिकेचा अधिकारी किंवा कर्मचारी आणि पोलिस किंवा गृहरक्षक दलाचे जवान अशा चौघांचा पथकात समावेश करण्यात आला आहे. (Creation of task force for 114 villages in Sinnar for corona control)

हि असेल टास्क फोर्सची जबाबदारी

पोलिसांचा या पथकात समावेश करण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्था राखून कोरोनाला अटकाव घालण्यास मदत होणार असल्याचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले. तहसीलदार कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी यासंबंधात आदेश काढला आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सर्वेक्षणाचे पर्यवेक्षण करणे, सर्वेक्षण योग्यरीतीने सुरू असल्याची खात्री करणे, कार्यक्षेत्रातील कोरोनाची लक्षणे दिसलेल्या व्यक्तींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणे, कार्यक्षेत्रात संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करणे, पॉझिटिव्ह रुग्णांना व गृहविलगीकरणास पात्र असलेल्या व्यक्तींना गृहभेटी देऊन अशा व्यक्तींच्या घरी स्वतंत्र निवासव्यवस्था असल्याची व बाधित व्यक्ती घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही अशा व्यवस्थेचे पालन होत असल्याची खात्री करणे, नसल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करणे, विलगीकरणाचे १४ दिवसांचे (quarantine) नियम पाळण्यासाठी संबंधितांना सूचना देणे, विलगीकरण केंद्राचे नियम पाळत नसल्यास संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करणे, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या मात्र १४ दिवसांपर्यंत विलगीकरणाचे नियम पाळत नसलेल्या व्यक्तींना पुन्हा संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करणे आदी जबाबदाऱ्या टास्क फोर्सवर सोपविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: आरक्षण मराठा तरूणांना खेळविण्याचा डाव

कारवाईचे अधिकार

आस्थापनांच्या वेळा काटेकोर पालन होत असल्याची खात्री करणे, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना पायबंद घालणे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतराचे पालन होत असल्याची खात्री करणे, विवाहाकरिता २५ व अंत्यविधीकरिता २० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची दक्षता घेणे, कोरोनाबाधितांच्या रहिवास ठिकाणी २४ तासांच्या आत प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून अशा क्षेत्रातून व्यक्तींचे आवागमन प्रतिबंधित करणे, केवळ वैद्यकीय कामासाठी एक मार्ग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या पथकावर सोपविली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम २००५ तसेच भारतीय दंडविधान कलम(IPC) १८६० चे कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार टास्क फोर्सला असतील.

हेही वाचा: खाद्यतेलात महागाईचा तडका! महिलांचे आर्थिक नियोजन बिघडले