पान दोन सेकंड मेन
-------------------------
23550
सिन्नर : कडवा कालवा
कडवा कालव्याचे २२ दिवसांचे रब्बी आवर्तन
पाणी मागणी अर्जासाठी तीनच दिवस शिल्लक; थकबाकीदार पाणी न देण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १७ : कडवा कालव्याच्या लाभ क्षेत्रासाठी रब्बी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये हे आवर्तन देण्यात येणार असून कालवा सल्लागार समितीच्या निर्णयांच्या अधीन राहून सूक्ष्म नियोजन होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्जासाठी २० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली असून त्यासाठी आता तीन दिवस उरले आहेत. तर थकबाकीदार असलेली शेतकऱ्यांना पाणी न देण्याचे सरकारचे निर्देश असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.
अलनिनोच्या प्रभावामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षणाकरिता मागणी आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात येत असल्याने सिंचनासाठी पाणी देण्याचे अधिकार राखून ठेवून रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक होताच हे नियोजन जाहीर केले जाणार असले तरी तत्पूर्वी प्रशासकीय पातळीवर आवर्तनाची तयारी सुरु करण्यात आली आहे.
-------
थकबाकीदार शेतकरी वगळले
पाणीपट्टी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी न देण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यामुळे अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकी भरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. किमान असे ७०० अधिक शेतकरी असण्याची शक्यता आहे. आवर्तन मिळणार असले तरी त्यावर विसंबून राहून नवीन पीक लागवड करणाऱ्यांनी पीक लागवड करू नये, अशी सूचनाही जलसंपदा विभागाने केली आहे.
---------
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
वडांगळीसह सात गावे, डांबरनाला बंधारा यावर पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या योजनांना प्राधान्याने पाणी देण्यात येणार आहेत. जनावरांची तहान भागवण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पाणी शिल्लक राहिल्यास प्राधान्यक्रमानुसार बारमाही पिकांना पाणी देण्यात येणार आहे.
-------
तर गुन्हे दाखल होणार
यापूर्वीचा अनुभव पाहता आवर्तनावेळी कालवा फोडणे, गेट तोडून पाणी पळवण्याच्या घटना घडल्या आहेत. आवर्तन सुरळीत चालण्यासाठी गस्ती पथकांची नेमणूक करण्यात येणार आहेत. कालवा परिसरातील वीज पुरवठा २२ तास बंद ठेवला जाणार आहे. आवर्तनात अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अर्ज नमुना सात मुदतीत भरावा, आवर्तन मिळणार म्हणून नवीन पिके लागवड करू नयेत.
- सचिन चव्हाणके (उपविभागीय अधिकारी, कडवा कालवा)