NSK26H33805
नवी दिल्ली : रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पिकविम्यासंबंधी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करताना श्रीमती रक्षा खडसे.
-----
पीकविम्यासह ‘फार्मर आयडी’तील तांत्रिक अडचणी दूर करा
उपशीर्षक
केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे; रक्षा खडसेंनी दिले रावेरसंबंधी निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : रावेर लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना महसुली गावांच्या पुनर्रचनेमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली.
श्रीमती खडसे यांनी बुधवारी (ता. २८) श्री. चौहान यांची भेट घेतली आणि त्यांना या समस्येबाबत निवेदन दिले. रावेर तालुक्यातील रावेर भाग-१, भाग-२, भाग-३, सावदा भाग-१, भाग-२, निंभोरा बुद्रुक भाग-१ आणि निंभोरा भाग-२ आदी नव्याने पुनर्रचित महसुली गावांमधील गट क्रमांक, सातबारा उतारे व खाते क्रमांक यांचे ऑनलाइन प्रणालीमध्ये पूर्णपणे मॅपिंग व एकत्रीकरण झालेले नाही. परिणामी, अनेक पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अर्ज भरताना, तसेच अॅग्रीस्टॅक प्रणालीमध्ये फार्मर आयडी तयार करताना अडचणी येत आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या योजनेची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याबाबत श्रीमती खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी केली, तसेच नव्याने पुनर्रचित महसुली गावांमधील जमिनीच्या नोंदींचे संबंधित ऑनलाइन पोर्टलवर तातडीने मॅपिंग व अद्ययावतीकरण करून पीकविमा अर्ज आणि फार्मर आयडी निर्मितीतील अडचणी दूर करण्याची मागणी केली.
यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी श्री. चौहान यांनी या समस्यांची दखल घेत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
महसुली नोंदींमधील तांत्रिक त्रुटींमुळे कोणताही पात्र शेतकरी पीकविमा व शासनाच्या कृषिविषयक योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.