धुळे टुडे ३ साठी...
---
फोटो-NSK26H31626
धुळे : सीटी स्कॅन सेवा सुरू करा, या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन विभागासमोर ठिय्या आंदोलन करतांना काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
---
सीटी स्कॅन बंदमुळे गरीब रुग्णांचे हाल
---
जिल्हा रुग्णालयातील समस्या; काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सीटी स्कॅन सेवा गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याने गरीब व गरजू रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गंभीर रुग्णांना नाईलाजास्तव खासगी केंद्रांमध्ये आठ ते दहा हजार रुपये मोजून सीटी स्कॅन करून घ्यावा लागत आहे. ही बंद पडलेली सेवा तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी मंगळवारी (ता. ६) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे माजी नगरसेवक अमीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्रणा बंद असल्याने अपघातातील गंभीर जखमी, डोक्याला दुखापत झालेले रुग्ण, स्ट्रोक आणि अंतर्गत रक्तस्राव झालेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. शासकीय रुग्णालयात तपासणी होत नसल्याने अशा गंभीर रुग्णांना खासगी तपासणी केंद्रांचा आधार घ्यावा लागत आहे. तेथे एका तपासणीसाठी तब्बल आठ ते दहा हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
देयकांमुळे सेवा प्रभावित
संबंधित सीटी स्कॅन सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे शासनाकडील थकीत देयक वेळेवर न मिळाल्याने ही सेवा बंद पडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. प्रशासनाने थकीत देयक तातडीने अदा करून सीटी स्कॅन सेवा पूर्ववत नियमित करावी. तसेच, सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत गंभीर व गरजू रुग्णांसाठी पर्यायी विनामूल्य सेवा शासकीय खर्चातून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
कारवाई करावी
महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा बंद पडण्यास कारणीभूत असणाऱ्या जबाबदार घटकांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. प्रशासनाने या संवेदनशील प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे. आंदोलनानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात माजी नगरसेवक पटेल यांच्यासह खान अबुलास, असलम बिराज, जुनेद खान, जहिर अहमद, मसुद वेल्डर, नविद अख्तर, महेमुदुल हसन, रमजान टेलर, रईस अहमद, मुजाहिर अन्सारी, आसिफ अन्सारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.
---