नाशिक- एरवी प्रत्येक वस्तूच्या खरेदीसाठी घासाघीस करण्याची मानवी प्रवृत्ती असताना जादा परताव्याच्या आमिषाने सायबर भामट्यांनी नाशिककरांच्या खिशातून तब्बल ५५ कोटींचा काढत डल्ला मारला आहे. त्यातही प्रामुख्याने शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीतून जादा कमाईच्या लालसेला बळी पडून सर्वाधिक २८ कोटी नाशिककर गमावून बसले आहेत. गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखाचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जनजागृती होत असतानाही सायबर भामटे नवनवीन क्लृप्त्या वापरून आर्थिक फसवणूक करीत आहेत. सायबर पोलिस ठाण्यामध्ये २०२४ या वर्षभरात सायबर गुन्हेगारांविरुद्ध १०४ गुन्हे दाखल झाले आहेत. विशेषतः २०२३ या वर्षाच्या तुलनेत २०२४ मध्ये सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे.