NSK26H34252
जळगाव : ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करताना खासदार स्मिता वाघ. यावेळी महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, डॉ. केतकी पाटील, शांता वाणी, विशाल भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
---
पत्रकारितेचा पाया मूल्यांवरच; नैतिकतेची जपणूक आवश्यक
खासदार स्मिता वाघ : ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १ : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सत्य, निष्पक्षता आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणे आवश्यक आहे. बदलत्या माध्यमविश्वात पत्रकारितेची दिशा भरकटू नये, यासाठी समाजहिताला प्राधान्य देणारी मूल्याधिष्ठित पत्रकारिता टिकली पाहिजे, असे प्रतिपादन खासदार स्मिता वाघ यांनी केले.
महाराष्ट्र संपादक परिषद, मुंबई यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जळगाव येथील गोदावरी फाउंडेशनच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात त्या बोलत होत्या. मानचिन्ह, शाल, धनादेश आणि वृक्षाचे रोप देऊन गुरव यांचा गौरव करण्यात आला. पत्रकारिता हे केवळ व्यवसायाचे साधन नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. समाजातील प्रश्न, अन्याय आणि नागरिकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पत्रकार पार पाडतात. त्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हता जपणे काळाची गरज आहे. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही वाघ यांनी दिले.
प्रास्ताविकात महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. पत्रकार पेन्शन योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र पत्रकारांना मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना श्री. गुरव यांनी पत्रकारितेतील संघर्षाचे अनुभव कथन केले. सत्याच्या बाजूने लेखन करताना अनेक अडचणी आल्या; मात्र आपण कधीही डगमगलो नाही, असे त्यांनी सांगितले. उपस्थितांच्या आग्रहाखातर आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
चौकट
‘प्रदीर्घ पत्रकारितेचा प्रवास नव्या पिढीसाठी मार्गदर्शक’
ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी गुरव यांच्या प्रदीर्घ पत्रकारितेचा प्रवास नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, त्यामुळे त्यांनी आत्मचरित्र लिहावे, असे आवाहन केले. यावेळी डॉ. केतकी पाटील, शांता वाणी, राजेश यावलकर, नगरसेवक विशाल भोळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. प्रसाद जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कुलथे यांनी आभार मानले.