धुळे : टुडे पान २ साठी... अँकर
--
दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना घ्या काळजी
--
दिवाळीत खबरदारीचे कृषी विज्ञान केंद्राचे ग्राहकांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरोघरी मिठाई, खवा, पेढे, बर्फी, तूप आणि पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र, याच काळात बाजारात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांची विक्री होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन येथील कृषी विज्ञान केंद्राचे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र शास्त्रज्ञ डॉ. धनराज चौधरी यांनी केले आहे.
-
दूध खरेदी करताना ग्राहकांनी नेहमी अधिकृत व विश्वासार्ह विक्रेत्यांची निवड करावी. पॅकबंद दुधावरील उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख काटेकोरपणे तपासावी. पिशवी फुगलेली, गळती असलेली किंवा खराब स्थितीत असल्यास ती खरेदी करू नये. तसेच दूध नेहमी चांगले उकळूनच वापरावे आणि योग्य तापमानाला साठवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. खवा आणि मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नेहमी स्वच्छ व परवानाधारक मिठाई विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. उघड्यावर ठेवलेली, माशा बसलेली किंवा धूळ लागलेली मिठाई आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. मिठाईचा रंग भडक किंवा कृत्रिम वाटत असल्यास ती टाळावी. मिठाई तयार केल्याची तारीख, वापरण्याची मुदत तसेच संशयास्पद वास, चव किंवा पोत तपासल्याशिवाय खरेदी करू नये, असा सल्ला डॉ. चौधरी यांनी दिला आहे.
-
पनीर तपासून घ्या
तूप आणि पनीर खरेदी करताना नेहमी सीलबंद व प्रमाणित ब्रँडला प्राधान्य द्यावे. पॅकिंगवरील FSSAI परवाना क्रमांक, घटक, बॅच क्रमांक व तारीख आवर्जून तपासावी. पनीर ताजे, योग्य तापमानात साठवलेले आणि स्वच्छ पॅकिंगमधील असावे. पॅकबंद पदार्थांची शीतसाखळी अचूकपणे टिकवली असल्याची खात्री करून घ्यावी. स्वस्त दरातील दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी विशेष सावध राहणे आवश्यक आहे. खरेदी केलेले सर्व पदार्थ योग्य तापमानात रेफ्रिजरेटरमध्ये सुरक्षित ठेवावेत. अन्नात भेसळीचा किंवा गुणवत्तेबाबत संशय आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. दिवाळीच्या या मंगलमय पर्वात ग्राहकांनी गुणवत्ता, स्वच्छता व शुद्धतेची पूर्ण खात्री करूनच खरेदी करावी आणि भेसळयुक्त पदार्थ टाळून सुरक्षित व आरोग्यदायी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.