धरणांतील गाळ काढून साठवण क्षमता वाढवा
राधाकृष्ण विखे-पाटील : दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा डेपो सुरू करणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२३ : पुरेशा पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पशुधनासाठी पाणी व चाऱ्याची उपलब्धता, धरणांतील गाळ काढून साठवण क्षमता वाढविणे आणि कालव्यांची गळती रोखण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था आणि पालखेड पाटबंधारे विभागाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.२३) आयोजित वाघाड धरण जलपूजन सोहळा व मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ अध्यक्षस्थानी होते.
विखे-पाटील म्हणाले, राज्यातील जलसाठ्यांची क्षमता टिकविण्यासाठी धरणांतील गाळ काढणे आवश्यक आहे. वाघाड धरणातील गाळाचे प्रमाण आणि तो काढल्यानंतर वाढणाऱ्या साठवण क्षमतेचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. नियमानुसार गाळ काढण्याच्या कामांना परवानगी द्यावी. त्यामुळे सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच कालव्यांची दुरुस्ती करून पाणीगळती रोखण्यावर भर द्यावा.
गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा
दुष्काळी भागातील पशुधनासाठी मुबलक चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा डेपो सुरू करण्यात येणार आहेत. पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या भागांत गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजनही करण्यात येत असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. जलसाठ्यांचे संवर्धन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि सिंचन व्यवस्थेतील सुधारणांद्वारे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी दिंडोरीप्रणीत सेवामार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, खासदार भास्कर भगरे, दिंडोरीच्या नगराध्यक्षा आशा कराटे, जलसंपदाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवले, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक :- एच-33407