टुडे एक : मेन फिचर
---
NSK26H33193 : किरण पाटील
---
तरुणींवर दुचाकीचा लाइट चमकविण्यावरून खून
खेडीत दांडियादरम्यानचा चिघळला वाद; चॉपर हल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : खेडी (ता. जळगाव) येथील माउलीनगर परिसरात दांडिया खेळणाऱ्या महिला - तरुणींवर दुचाकीचा हेडलाइट चमकवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर खुनाच्या घटनेत झाले. संशयितांनी केलेल्या चॉपर हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४०) यांचा खून झाला असून किशोर छगन पाटील (वय ४६) गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खेडी गावातील माउलीनगर येथील टीव्ही टॉवर परिसरात गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (ता.२०) दसऱ्याच्या दिवशीच रात्री पावणेदहाच्या सुमारास ट्रिपलसीट दुचाकीवरुन आलेल्या संशयितांनी दांडिया खेळणाऱ्या महिला-तरुणींवर दुचाकीचा हेडलाइट चमकवला. डोळ्यावर लाइट येत असल्याने महिलांनी या तरुणाला जाब विचारला असता तिघांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. या वादात परिसरातील लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करुन या तरुणांना निघून जाण्यास सांगितल्याने वाद चिघळला.
मध्यस्थींवर चॉपरहल्ला
या वादात पराग नावाच्या तरुणाने वाद घालत असतानाच तिघांपैकी एकाने चॉपर काढून किरण विठ्ठल पाटील यांच्या छातीत खुपसला. झटापटील हल्लेखोराने नंतर किशोर पाटील यांच्यावरही वार केला. त्यांच्या छातीत मध्यभागी चॉपरचा वर्मी घाव लागला असून तातडीने दोघांना उपचारार्थ रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती किरण पाटील यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले तर किशोर पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
परिसरात संतापासह भीती
किरण पाटील हे सुप्रीम कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. दुसरीकडे किशोर छगन पाटील यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादातून एका व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
तिघा हल्लेखारांची ओळख पटली
चॉपर हल्ल्यात मयूर जाधव, रोहित पाटील आणि अन्य एका संशयिताचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तिघेही याच परिसरातील रहिवासी असून हल्ल्यानंतर त्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच निरीक्षक बबन आव्हाड, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------