ॲंकर
दांडिया (टिपऱ्यांचा संग्रहित फोटो वापरावा)
दांडियासाठी यंदा टिपऱ्यांचेही बुकिंग; दरात २० टक्क्यांनी वाढ
(उपशीर्षक)
लाकूड, रंग आणि साहित्य महागले; ३० रुपयांची जोडी आता ४० रुपयांना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : नवरात्रोत्सवाचा जागर रविवारपासून (ता. ११) सुरु होणार असून, सर्वत्र गरबा, दांडियाच्या कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सार्वजनिक मंडळे, विविध संस्था आणि तरुणाईकडून दांडिया स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार मोठ्या मंडळांकडून बुकिंग केले जात असून यंदा या उत्सवावर महागाईचे सावट आहे. दांडिया तयार करण्यासाठी लागणारे लाकूड, रंग आणि इतर साहित्याच्या दरात वाढ झाल्याने दांडियाच्या किमतीत साधारण २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नवरात्रोत्सव म्हटला म्हणजे देवीची आराधना करत नऊ दिवस उपवास व रात्रीच्या वेळी गरबा– दांडीयाचे आयोजन केले जात असते. शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला मंडळे, सार्वजनिक मंडळे आणि गरबा आयोजकांकडून दांडियाची खरेदी केली जाते. अनेक ठिकाणी गरबा- दांडिया स्पर्धांचे आयोजन होत असल्याने रंगीबेरंगी दांडियांना पसंती दिली जाते. त्यामुळे उत्सवापूर्वीच विक्रेते आणि कारागीरांकडून साठा तयार ठेवण्यावर भर दिला जात आहे.
साध्या दांडियाची जोडी ४० रुपयांना
नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडियासाठी रंगीबेरंगी टिपऱ्यांना मोठी मागणी असते. गतवर्षी ३० रुपये जोडीने मिळणारे साधे दांडिया यंदा ४० रुपये जोडीने विकले जात आहेत. तर आकर्षक रंगसंगती आणि सजावट असलेल्या सप्तरंगी दांडियाच्या दरातही वाढ झाली आहे. गतवर्षी ६० रुपये जोडीने मिळणारे सप्तरंगी दांडिया ७० ते ८० रुपये जोडीने उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना दांडिया खरेदीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे.
इन्फो
कारागिरांची लगबग
नवरात्रोत्सव जवळ आल्याने देवीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांसह दांडिया तयार करणाऱ्या कारागिरांची देखील लगबग वाढली आहे. बांबूपासून दांडिया तयार करण्यासाठी लाकूड योग्य आकारात कापणे, त्याला गुळगुळीत करणे, रंग देणे आणि आकर्षक नक्षीकाम करणे अशा विविध प्रक्रिया केल्या जातात. मागणी लक्षात घेऊन कारागीर मोठ्या प्रमाणावर दांडिया तयार करण्यात व्यस्त आहेत.