
नाशिक : धोकादायक घरांचे नळ कनेक्शन तोडणार - महापालिका आयुक्त
नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील धोकादायक १०७७ इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यापैकी ७८६ जणांना प्रत्यक्ष नोटिसा बजाविण्यात आल्या. महिन्यानंतर दुसरी नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर प्रतिसाद न दिल्यास थेट वीज मीटर, नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे.
संबंधितांनी अतिधोकादायक घर रिकामे न केल्यास, वीज मीटर काढण्यापासून पाण्याचे नळकनेक्शनदेखील कापण्यात येणार आहे. तसेच पोलिस यंत्रणेद्वारे अशा घरांना रिकामे करण्याची कारवाई होणार आहे. दर पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून धोकादायक व अतिधोकादायक इमारती, वाडे तसेच घरांना नोटिसा बजावल्या जातात. जुने नाशिक तसेच पंचवटी, गंगाघाट परिसरातील जुने वाडे दर पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना यापूर्वी झाल्या आहेत. दरम्यान, यंदा आयुक्त रमेश पवार यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहे. यामुळे पहिली नोटीस नंतर एक महिन्याच्या काळानंतर दुसरी नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतरदेखील घरे रिकामे न झाल्यास जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेऊन महापालिका तसेच पोलिस प्रशासनाकडून कारवाई होणार आहे. तसेच, संबंधितांची यादी वीज वितरण कंपनीला देऊन त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यानंतर महापालिकेकडून नळ कनेक्शन देण्यात आले आहे, तेदेखील कापण्यात येणार आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना दिलेल्या अधिकारअंतर्गत जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेऊन पोलिस असे धोकादायक घरे, वाडे व इमारतींना रिकामे करणार आहे. भाडेकरू व घर मालक यांच्यातील वादामुळे जुने नाशिक तसेच गंगा घाट परिसरातील अनेक वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत आले असले तरी त्याबाबत कारवाई होत नाही. मात्र, महापालिका आयुक्तांच्या भूमिकेमुळे शहरातील हा जुना तसेच गंभीर प्रश्न मार्गी लागणार आहे.
हेही वाचा: ओबीसी आरक्षणासाठी अडीच वर्षात काय केले? आमदार फरांदे
विभागनिहाय नोटिसा
नाशिक पूर्व ११७
नाशिक पश्चिम ६००
पंचवटी विभाग १९८
नाशिक रोड ६९
सिडको २५
सातपूर ६८
एकूण १०७७
धोकादायक इमारतींमुळे जीवित व वित्तहानी होते. यामुळे आता कारवाई करण्याचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. दुसऱ्या नोटीस नंतर वीज मीटर काढणे तसेच नळ कनेक्शन बंद करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. - संजय अग्रवाल, अधीक्षक, मनपा नगर नियोजन
हेही वाचा: Nashik : महासभेत प्रस्ताव कमी अन् वादावादीच जास्त
Web Title: Dangerous House Water Connection Will Cut Order Of Nashik Municipal Commissioner
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..