दारुल कजाचे कार्यालय पेटविले
---
कौटुंबिक वादातून संताप; कागदपत्रे, संगणक व साहित्य खाक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : कौटुंबिक वादाच्या प्रकरणात दारुल कजाने (मुस्लिम शरिया कोर्ट) पत्नीच्या बाजूने निर्णय दिल्याचा राग मनात धरून संतापलेल्या तरुणाने दारुल कजाचे कार्यालय पेटवून दिले. ही घटना बुधवारी (ता. ४) घडली. आगीत अत्यावश्यक कागदपत्रे, संगणक आणि फर्निचर खाक झाले.
मेहरुण अक्सा मशिदीजवळील दारुल कजाच्या कार्यालयास बुधवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. माहिती मिळताच तरुणांनी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, आगीत फर्निचर, खटल्याची कागदपत्रे, संगणक, प्रिंटर, इन्व्हर्टर, फायबरच्या तीन खुर्ची व १ फोमची खुर्ची खाक झाली.
एमआयडीसी पोलिसांत दारुल कजा (शरिया कोर्ट) नायब काझी, फरहान रहेमान खान (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जाबाज जाकिर शहा (वय २९, रा. हिंगणे, ता. यावल) याचा पत्नीसोबत कौटुंबिक वाद झाला होता. वाद दारुल कजा येथे पोहोचला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून शरिया कोर्टाने जाबाज शहा याच्या पत्नीच्या बाजूने निकाल दिला. माझ्याविरुद्ध निकाल दिल्याच्या संतापातून त्याने येथील लोकांना आदल्याच दिवशी दमदाटी केली. दुसऱ्या दिवशी चक्क दारुल कजाचे कार्यालय आग लावून पेटवून दिले.
चौकट
सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बिंग
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये संशयित जाबाज जाकीर शहा बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास अनधिकृतपणे कार्यालयात शिरताना आढळला. त्यानेच आग लावून नंतर पळ काढल्याचे सीसीटीव्हीत चित्रीत झाल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक अशोक काळे तपास करीत आहेत.