दत्तनगरच्या पिवळ्या पाण्याने उद्योगांना दणका!
१७ कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश, २७५ हून अधिक उद्योगांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या दत्तनगर परिसरात कूपनलिकांमधून रसायनयुक्त पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या गंभीर प्रकाराची जिल्हा प्रशासनाने दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रदूषण नियंत्रण यंत्रणा अपुऱ्या किंवा अकार्यक्षम असल्याचे आढळल्याने १७ उद्योगांना उत्पादन तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, दूषित पाण्यामुळे नागरिकांना त्वचेचे विकार जडत असल्याने भूजल प्रदूषणाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.
दत्तनगर परिसरातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता भूजल दूषित असल्याचे आढळले. या पाण्यात एकूण क्रोमियमचे प्रमाण ४५ पीपीएम नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महानगरपालिका आणि इतर संबंधित विभागांकडून चौकशी करण्यात येत आहे.
१७ उद्योगांवर कारवाईचा बडगा
अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांची तपासणी करताना १७ उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा अपुऱ्या स्वरूपात असल्याचे किंवा योग्य प्रकारे कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित उद्योगांना नोटिसा बजावून उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पाच उद्योगांविरोधात प्रस्तावित निर्देश जारी करण्यात आले आहेत. तपासणीतील निरीक्षणे आणि लागू पर्यावरणविषयक कायदे व नियमांनुसार संबंधित उद्योगांवर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
भूजल प्रदूषणाच्या कारणांचा शोध
दत्तनगर हा अंबड औद्योगिक वसाहतीतील एफ ब्लॉक झोनलगतचा निवासी भाग असल्याने या परिसरातील औद्योगिक घटकांच्या तपासणीवर प्राथमिक टप्प्यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. उद्योगांकडून पर्यावरणविषयक नियमांचे पालन होते का, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सक्षम व कार्यरत आहेत का आणि भूजल प्रदूषणामागे कोणती कारणे आहेत, याची पडताळणी केली जात आहे.
२७५ हून अधिक उद्योगांची तपासणी
जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने अंबड औद्योगिक वसाहतीत संयुक्त तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत २७५ हून अधिक उद्योगांची तपासणी करण्यात आली आहे. या वसाहतीत प्रामुख्याने अभियांत्रिकी, रबर, प्लास्टिक, औषधनिर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतील उद्योग कार्यरत आहेत. यापैकी ८९ उद्योगांमध्ये इलेक्ट्रोप्लेटिंग, गॅल्वनायझिंग, फॉस्फेटिंग आणि पावडर कोटिंग यांसारख्या प्रक्रिया केल्या जात असल्याने औद्योगिक सांडपाणी निर्माण होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रण व्यवस्था आणि पर्यावरणविषयक नियमांच्या पालनाची तपासणी महत्त्वाची ठरत आहे. दत्तनगरमधील भूजल प्रदूषणाचे नेमके कारण शोधून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.