खळबळजनक! हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला; नांदूरशिंगोटे बायपासवर आढळली बेवारस दुचाकी | dead body found thrown into water with hands tied Abandoned bike found on Nandurshingote bypass Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gaurav Naikwade

Nashik Crime: खळबळजनक! हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला; नांदूरशिंगोटे बायपासवर आढळली बेवारस दुचाकी

Nashik Crime : नाशिक पुणे महामार्गावरील नांदुर-शिंगोटे येथे बायपास लगत असलेल्या नाल्यामध्ये हात बांधलेल्या व तोंडात कापडाचा बोळा कोंबलेल्या अवस्थेत पंचवीस वर्षीय तरुणाचा तरंगणारा मृतदेह व दोन दिवसांपासून बेवारस स्थितीत उभी केलेली दुचाकी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून तो तरुण लामखेडे मळा, तारवाला नगर, पंचवटी ( नाशिक) येथील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. (dead body found thrown into water with hands tied Abandoned bike found on Nandurshingote bypass Nashik Crime)

नांदूर शिंगोटे - वावी रस्त्यावर बायपासलगत असलेल्या नाल्यात पावसाचे पाणी भरलेले आहे. या पाण्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उत्तम कचरू शेळके यांना डोके पाण्याबाहेर असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

याबाबत त्यांनी नांदूर शिंगोटे पोलीस दुरुक्षेत्रात माहिती दिली. वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतदेहाची आजूबाजूला फिरून पाहणी केली असता पाठीमागून हात बांधलेल्या व तोंडात कापडाचा बोळा घातलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळले.

सहाय्यक निरीक्षक श्री. लोखंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत नाशिक येथून फॉरेन्सिक तज्ञांना पाचारण केले. हे पथक आल्यानंतर स्थानिक तरुणांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला.

दरम्यान सोमवारी सकाळपासून घटनास्थळाच्या लगत नाशिक पुणे महामार्गावर बेवारस अवस्थेत एम एच 15 एफ एच 54 37 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची एक्टिवा मोटरसायकल उभी होती. याबाबत देखील स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.

त्यानुसार पोलिसांनी सदर दुचाकीची पडताळणी केली असता ती दिंडोरी रोड, पंचवटी येथील एका व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले. ती त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर मृत तरुणाची ओळख पटली.

गौरव संपत नाईकवाडे राहणार लामखेडे मळा, तारवाला नगर, पंचवटी असे या तरुणाचे नाव आहे. सदर स्कुटी घेऊन तोच गेला होता व रविवारपासून घरी आला नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

दरम्यान सदर प्रकारात घातपाताचा संशय असल्याने पोलिसांनी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शबविच्छेदनासाठी पाठवला. निफाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.