esakal | एकाही डॉक्टराने नाही तपासले; अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच सोडला प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

nandu sonawane

एकाही डॉक्टराने नाही तपासले; अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच सोडला प्राण

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : अचानक श्‍वास घेण्यास त्रास होतोय म्हणून उपचारासाठी (treatment) खासगी रुग्णालयांचे (private hospital) उंबरठे झिजवूनही एकाही खासगी डॉक्टराने (private doctor) संबंधित रुग्णास तपासण्याची तसदीदेखील न घेतल्याने अखेर त्या रुग्णाने (patient) जिल्हा रुग्णालयाच्या (district hospital) प्रवेशद्वारावरच प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता.९) घडली. काय घडले नेमके?

हतबल लेकीला ढसाढसा रडू कोसळले

वडिलांचे प्राण वाचवू न शकल्याचे शल्य मनात बाळगून अखेरच्या क्षणी सोबत असलेल्या पोटच्या मुलीला ढसाढसा रडू कोसळले. हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांनाही अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे ‘रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा’ अशी शपथ घेणाऱ्या काही खासगी व्यावसायिक डॉक्टरांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना चाचणी केली असता रुग्ण निगेटिव्ह आढळून आला.

हेही वाचा: जिल्ह्यात 23 मे पर्यंत लॉकडाऊन! कडकडीत बंद

अखेर प्रवेशद्वारावरच रुग्णाने सोडला प्राण

सिडको परिसरातील उदय कॉलनीजवळील तोरणानगर येथे नंदू सोनवणे कुटुंबीयांसमवेत राहतात. ते महापालिकेत सफाई कर्मचारी होते. काही दिवसांपासून त्यांची पत्नी महापालिकेच्या बिटको रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहे. यादरम्यान रविवारी पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अशावेळी परिसरात सामजिक कार्य करणारे रिक्षाचालक भगवान मराठे मदतीला धावून आले. मराठे यांनी सोनवणे व त्यांच्या मुलीला रिक्षात बसवत लेखानगर येथील तीन खासगी रुग्णालयांत विनंती करून रुग्णास तपासण्याचा आग्रह धरला. मात्र, तीनही खासगी रुग्णालयांनी एकमेकांकडे बोट करून त्या रुग्णालयात जाऊन तपासा म्हणून सांगितले. अखेर मराठे हे सोनवणे यांना जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, याचदरम्यान प्रवेशद्वारावरच रुग्णाने प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली. वडिलांचे प्राण वाचू न शकल्याची खंत व्यक्त करीत मुलीला रडू कोसळल्याचे पाहून आजूबाजूला उपस्थित नागरिकांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्याचे दृश्य बघायला मिळाले.

आई बिटकोत कोरोनावर उपचार घेत आहे. वडिलांना रविवारी सकाळी श्‍वास घेण्यास त्रास झाला म्हणून लेखानगर येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेलो. परंतु, एकाही डॉक्टरने साधे तपासलेदेखील नाही. माझ्या डोळ्यासमोर वडिलांनी प्राण सोडले, याची खंत मला आयुष्यभर राहील.

- माया केदारे, मृत रुग्णाची मुलगी

हेही वाचा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती; लहान मुलांसाठी महापालिकेचे 'असे' नियोजन

सद्यःस्थितीत लोकांना सेवा देण्याची गरज आहे, हा उद्देश लक्षात घेऊन कोरोना रुग्णांना मोफत प्रवाससेवा देण्याचे काम करीत आहे. आजच्या रुग्णाला एखाद्या डॉक्टरने साधे तपासले जरी असते तरी त्याचा प्राण वाचला असता. लेखानगर येथील लाइफ केअर, सुविधा व सोमाणी या खासगी रुग्णालयांनी रुग्णास तपासण्यास नकार दिला. याची चीड येते.

- भगवान मराठे, सामाजिक कार्यकर्ता व रिक्षाचालक, सिडको