esakal | महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्मशानात मृत्यूचे तांडव!
sakal

बोलून बातमी शोधा

death

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्मशानात मृत्यूचे तांडव!

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना मृत्यूच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या सोळा दिवसांत शहरातील सतरा स्मशानभूमीमध्ये तब्बल दोन हजार ३६० मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी ६१२ टन लाकूड वापरले गेले आहे. विशेष म्हणजे, यात दफनविधी करणाऱ्या मुस्लिम, ख्रिश्‍चन, लिंगायत, गोसावी आदी समाजांतील आकडेवारी नसल्याने मृतांची संख्या यापेक्षा अधिक आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्मशानभूमीमध्ये पंधरा दिवसांतच एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह जाळण्यात आले आहेत.

बाराशेच्या वर मृतांची संख्या असल्याची नोंद

फेब्रुवारीपासून शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सहा ते आठ पटींनी हा वेग जास्त आहे. आतापर्यंत शहरात दीड लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. महापालिकेकडे बाराशेच्या वर मृतांची संख्या असल्याची नोंद दर्शविली जात असली तरी प्रत्यक्षात ही संख्या दुपटीने अधिक आहे. हा आकडा फक्त लाकडावर जाळलेल्या मृतदेहांचा आहे. विद्युतदाहिनी, गॅसदाहिनीसह अन्य धर्मियांची आकडेवारी यात नाही. सोळा दिवसांत दोन हजार ३६० अंत्यसंस्कार करण्यात आले. यात सर्वाधित अंत्यसंस्कार पूर्व विभागात झाले आहेत. याच विभागात सर्वाधिक मोठे हॉस्पिटल, महापालिकेचे झाकिर हुसेन रुग्णालय आहे. त्याशिवाय शहरातील अन्य भागांतूनही पूर्व विभागातील नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी लोक येतात.

बाहेरगावचे अंत्यसंस्कार नाशिकमध्ये

कोविड नियमाप्रमाणे संसर्ग वाढू नये म्हणून ज्या भागात कोविड रुग्णाचा मृत्यू झाला त्याच भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना आहेत. नाशिक शहरात उत्तर महाराष्ट्र, तसेच ग्रामीण भागातील कोविड रुग्ण उपचारासाठी आलेले आहेत. ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर नाशिकमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आल्याने शहरात आकडा मोठा दिसत असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा: विवाह मुहूर्त टळले, तर वर्ष वाया जाणार... !

नाशिक शहरात उत्तर महाराष्ट्रासह ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोविड रुग्णाचा ज्या भागात मृत्यू झाला त्याच भागात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना असल्याने शहरात मृत्यूचा आकडा वाढलेला दिसतो.-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

एप्रिलमधील विभागनिहाय मृत्यू

विभाग कोविड मृत्यू सर्वसाधारण मृत्यू एकूण

पंचवटी ४९४ १८६ ६८०

नाशिक रोड ३९० ४४ ४३४

पूर्व ५४५ १०८ ६५३

सिडको ३१२ १७८ ४९०

सातपूर ५२ ५१ १०३

एकूण १,७९३ ५६७ २,३६०