esakal | नाशिकमध्ये मृतांच्या आकड्यांचा खेळ; 15 दिवसांत 2 हजारांहून अधिक दहन
sakal

बोलून बातमी शोधा

corona death toll

नाशिकमध्ये मृतांच्या आकड्यांचा खेळ; 15 दिवसांत 2 हजारांहून अधिक दहन

sakal_logo
By
विक्रात मते

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असून, मृत्यूच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. परंतु महापालिका प्रशासनाकडून नेमके किती मृत्यू झाले, याची आकडेवारी प्राप्त होत नाही. पंधरा दिवसांत म्हणजे १ ते १५ एप्रिलपर्यंत ६१२ टन लाकूड अंत्यविधीसाठी लागल्याने त्यातून फक्त दहन केलेल्या मृतांची आकडेवारी दोन हजार १८६ च्या वर पोचत असल्याचे दिसून येते. विद्युत, गॅस शवदाहिनीच्या आकड्यांचा यात समावेश नाही. याशिवाय लिंगायत, ख्रिश्चन तसेच मुस्लिम धर्मीय मृतांच्या आकडेवारीही यात समाविष्ट नसल्याने प्रत्यक्षात पंधरा दिवसांत कोरोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा चार हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जानेवारीत उतरणीला लागलेल्या कोरोनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये उसळी घेतली. मार्चमध्ये देशातील पहिल्या दहा शहरांत नाशिक पाचव्या स्थानावर होते. १ ते १५ एप्रिल या कालावधीत शहर देशात चौथ्या क्रमांकावर आले. नाशिक जिल्ह्यात १५ एप्रिल २०२१ पर्यंत दोन लाख ४८ हजार ८६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने पंधरा दिवसांत तब्बल ६७ हजार नवीन रुग्ण बाधित झाल्याने कोरोनाचा वेग सात ते आठपटींनी वाढत असल्याचे स्पष्ट झाले. पंधरा दिवसांत शहरी भागात १६६ मृत्यू झाल्याचे सरकारी कागदांवर दिसून येत असले तरी प्रत्यक्षात अनेक पटींनी मृत्यू झाल्याचे स्मशानभूमीत वापरात आलेल्या लाकडातून दिसून येत आहे.

हेही वाचा: माणुसकीच नव्हे, संवेदनाही हरपल्या! बिलासाठी घेतल्या मृत महिलेच्या बांगड्या

२१८६ मृत्यूचा अंदाज

मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत समाजात दफनविधी होतात. हिंदू धर्मात लाकडावर दहन केले जाते. कोविडमुळे विद्युतदाहिनी व गॅस दाहिनीवर कोरोनाबाधित मृतदेहांचे दहन करण्याच्या सूचना होत्या. मात्र सहा ते सात तास वेटिंग असल्याने लाकडावर दहन करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. फक्त लाकडांचा हिशेब केल्यास मृत्यूची आकडेवारी समोर येते. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सात मण लाकडांचा पुरवठा महापालिकेकडून केला जातो. सात मण लाकूड म्हणजे २८० किलो एका अंत्यसंस्कारासाठी लागतात. १ ते १५ एप्रिलदरम्यान ६१२ टन याप्रमाणे सहा लाख १२ हजार किलो लाकूड लागले. एका अंत्यसंस्कारासाठी २८० किलो लाकूड लागत असेल, तर सहा लाख १२ हजार किलो लाकडे दोन हजार १८६ मृतांसाठी लागल्याचे स्पष्ट होते. ही आकडेवारी फक्त हिंदू अंत्यसंस्काराची आहे. याचाच अर्थ महापालिकेकडून मृतांची आकडेवारी लपविली जात आहे. जर मृत्यू एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले नसतील, तर लाकडांच्या आकड्यांमध्ये घोळ होत असल्याचे स्पष्ट होते.

मृतांची खरी आकडेवारी येण्यास विलंब

नाशिक शहरात महापालिकेच्या सतरा स्मशानभूमी आहेत. अंत्यविधीपूर्वी महापालिकेच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. अंत्यविधी झाल्यानंतर विभागनिहाय जन्म-मृत्यू विभागात त्याची नोंद होते. मात्र रोजचा मृतांचा आकडा किती, याबाबत माहिती प्राप्त होण्यास आठ ते दहा दिवस लागतात. सध्या कोरोनाच्या कामात सर्वच कर्मचारी व्यस्त असल्याने विभागनिहाय मृतांचा आकडा मिळण्यास अडचण निर्माण होत असल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले.

हेही वाचा: अंत्यसंस्कारासाठी कोळसा वापरण्याची वेळ! वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव