YEO26B27493
येवला : दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी
-----------
३६-४
परंपरेचा वारसा जपत पाडवा उत्साहात
-----------
येवला : देवदर्शनानंतर मीठ- कापूस खरेदीची शेकडो वर्षांची प्रथा कायम
-------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१३ : दीपोत्सवातील मांगल्य, नववर्षाच्या स्वागताचा उत्साह आणि पिढ्यान्पिढ्या जपलेल्या परंपरांचा सुगंध अशा भक्तिमय वातावरणात शहरात दीपावली पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानल्या जाणाऱ्या या शुभदिनी देवदर्शनासाठी शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. देवदर्शनानंतर मीठ आणि कापूस खरेदी करून त्याचे पूजन करण्याची शेकडो वर्षांची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा श्रद्धेने जपल्याचे यंदाही दिसले.
-------------
पाडव्यानिमित्त शहरातील पुरातन बालाजी मंदिर, मोठे महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, रोकडोबा मंदिर यांसह विविध देवस्थानांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरांची आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसराला विशेष मांगल्य प्राप्त झाले होते. विठ्ठल- रुक्मिणी, बालाजी महाराज तसेच महादेवाच्या दर्शनासाठी महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी सहकुटुंब उपस्थिती लावली. जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
१६-१
मीठ- कापूस खरेदीची परंपरा
शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य़ांमध्ये पाडव्याच्या दिवशी केली जाणारी मीठ आणि कापूस खरेदी विशेष महत्त्वाची मानली जाते. देवदर्शनानंतर बाजारातून मीठ व कापूस खरेदी करून ते देवाला अर्पण करणे आणि घरी आणल्यानंतर त्याचे विधिवत पूजन करण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. घरात सुख, समृद्धी, बरकत आणि भरभराट नांदावी, या श्रद्धेतून येवलेकर आजही ही परंपरा मोठ्या उत्साहाने पाळतात. बदलत्या काळातही आपल्या पूर्वजांनी दिलेला हा सांस्कृतिक वारसा जपण्याची शहरवासियांची आस्था यानिमित्ताने अधोरेखित झाली.
१६-१
भाविकांसाठी अल्पोपाहार
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे आणि शिंदे फाउंडेशनतर्फे भाविकांसाठी स्नेहपूर्ण अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले. बालाजी गल्ली येथे बालाजी मित्र मंडळातर्फे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दुधाचे वाटप करण्यात आले. प्रभाकर झळके यांच्या हस्ते उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------