Increased Bribery Cases in Nashik : नाशकात लाचखोरांची वाढतेय हाव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

Increased Bribery Cases in Nashik : नाशकात लाचखोरांची वाढतेय हाव!

नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांना जेरबंद करत नवा अध्याय रचला आहे. सिन्नर येथे शासकीय आयटीआयच्या प्राचार्याला तीस हजारांची लाच घेताना, तर नाशिकमध्ये मंडळ अधिकाऱ्यासह खासगी महिलेला पन्नास हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. सुरगाण्यात तिघांना दहा हजारांची लाच घेताना अटक झाली. दरम्यान नाशिक परिक्षेत्रात दहा महिन्यांत १०४ लाचखोर सापडले, तर नाशिकमध्ये ३७ जणांना अटक झाली. (demand 30 thousand to clear contractor bill Principal of Govt ITI arrested Nashik Bribery Crime News)

हेही वाचा: Nashik : नांदगाव तालुक्यात 290 वनराई बंधारे; शेकडो हेक्टर शेती येणार ओलिताखाली!

सिन्नर येथील शासकीय आयटीआयचे प्राचार्य नीलेश ठाकूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० हजारांची लाच घेताना अटक केली आहे. तक्रारदाराने आयटीआयमध्ये कोबा आणि वॉटरप्रूफिंगचे काम केले होते. या कामाचे बिल अकरा लाख ५१ हजार २९८ रुपये मंजूर होते. संबंधित रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात प्राचार्य ठाकूर यांनी तीन टक्क्यांप्रमाणे ३० हजारांची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, त्यानुसार नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालय कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला होता. या ठिकाणी प्राचार्य ठाकूर यांनी तक्रारदाराकडून ३० हजारांची रक्कम स्वीकारली. त्यानंतर दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ठाकूर यांना अटक केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई अधीक्षक सुनील कडासने, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

महसूल आघाडीवर, पोलिस दुसऱ्या स्थानी

दहा महिन्यांत राज्यात महसूल विभागातील १४५, तर पोलिस विभागातील १३७ लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. राज्यात लाचखोरीच्या प्रकारात पुणे अव्वल स्थानी असून, नाशिक दुसऱ्या स्थानी आहे. पुणे परिक्षेत्रात १३३ गुन्ह्यांमध्ये १८७ लाचखोरांना अटक झाली. नाशिकमध्ये १०४ गुन्ह्यांमध्ये १४८ लाचखोरांना गजाआड करण्यात आले. याव्यतिरिक्त मुंबईत ३७ ठाण्यांत ७०, नागपूरमध्ये ६८, अमरावती ५५, औरंगाबादमध्ये ९८, तर नांदेडमध्ये ५६ गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: Increased Encroachment in City : वाढतं अतिक्रमण वाहतूक कोंडीचं कारण ठरतंय!