NSK26H33860
जळगाव : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देताना सकल हिंदू समाजाचे बांधव.
------
किनगाव घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा
सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; सखोल चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२९ : किनगाव (ता. यावल) येथे विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलनादरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संबंधित समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
किनगाव येथे २५ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला पोलिस विभागाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, या पथसंचलनादरम्यान काही समाजकंटकांनी अडथळे निर्माण करून तणावाची परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, या घटनेनंतर समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओंच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याबाबतही निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी. घटनेशी संबंधित सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना महामंडलेश्वर जनार्दन महाराज, श्यामचैतन्य बापू (पाल आश्रम), गजानन महाराज वरसाळेकर, वेदमूर्ती श्रीराम महाराज जोशी, योगेश्वर गर्गे (प्रांत मंत्री विहिंप), प्रांत सहमंत्री ललित चौधरी, जिल्हा कार्यवाह हितेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष विहिंप हरीश मुंदडा, जिल्हा मंत्री राकेश लोहार, उज्ज्वल चौधरी महानगर कार्यवाह, हरीश कोल्हे, बंटी नेरपगारे, राजेंद्र गांगुर्डे व समस्त सकल हिंदू समाजातर्फे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
-------
चौकट
‘घटनेमागील कारणांचा शोध घ्या’
किनगाव घटनेमागील नेमकी कारणे, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या व्हिडिओंची सत्यता यांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.