धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H34007
धुळे : अमानुष पद्धतीने कर्ज वसुली करणाऱ्या खासगी बँका, फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांना देतांना शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी.
---
फायनान्स कंपन्यांकडून अमानुष कर्जवसुली
---
शिवसेना (उबाठा); गुन्हे दाखल करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३० : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना व खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असतांना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका आणि विशेषतः खासगी फायनान्स कंपन्यांचे वसुली एजंट रात्री- अपरात्री शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ, दमदाटी करत अमानुषपणे कर्ज वसुली करत आहेत. अशांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली.
दुष्काळ संपेपर्यंत जिल्ह्यातील सर्व कृषी कर्ज, पीक कर्ज आणि ट्रॅक्टर कर्जवसुलीला तत्काळ स्थगिती देण्याचा आदेश काढण्यात यावा, शेतकऱ्यांना दमदाटी व अपमानास्पद वागणूक देऊन वाहने/अवजारे जप्त करणाऱ्या फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांकडे भांडवल शिल्लक नसल्याने सर्व बँकांना तत्काळ व सुलभ रीतीने पीक कर्जवाटप सुरू करण्याचे निर्देश द्यावेत. सावकारी कायद्याचे उल्लंघन करून दोन ते तीन टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारणाऱ्या सावकारांवर कडक कारवाई करण्यात यावी आदी मागण्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पालकमंत्री रावल यांच्याकडे केल्या.
पालकमंत्र्यांचे आश्वासन
शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर पालकमंत्री रावल यांनी या विषयात तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. खासगी फायनान्स कंपन्यांनी अथवा वसुली एजंट्सनी अरेरावी किंवा दमदाटी केल्यास शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी. तक्रार प्राप्त होताच संबंधित दोषींवर तत्काळ व कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केल्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाने म्हटले आहे. या वेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, उपजिल्हाप्रमुख निंबा मराठे, महानगरप्रमुख धीरज पाटील, जिल्हा संघटक प्रशांत भदाणे, अण्णा फुलपगारे, कपिल लिंगायत, गुलाब धोबी, राजू पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---