SKD26B04352
शिंदखेडा : गटशिक्षणाधिकारी चंदन शिवदे त्यांना निवेदन देताना सुनील चौधरी, जयवंत बोरसे, दीपक अहिरे आदी.
-------
दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करा
काँग्रेसची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. १४ : संपूर्ण धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा फी माफ करावी आणि कोणत्याही विद्यार्थ्याकडून परीक्षा फी वसूल करू नये, अशी मागणी शिंदखेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गटशिक्षणाधिकारी चंदन शिवदे यांना निवेदन दिले.
दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शेतीचे नुकसान, पावसाची अनिश्चितता आणि वाढता शेतीखर्च यामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी वसूल केल्यास पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका चौधरी यांनी निवेदनातून मांडली.
शिंदखेडा तालुक्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील दहावी- बारावीच्या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यासाठी संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा. तसेच, कोणताही विद्यार्थी फी भरू न शकल्यामुळे परीक्षा अर्ज भरण्यापासून किंवा परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. या निवेदनावर तातडीने कार्यवाही करून त्याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
या वेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जयवंत बोरसे, आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, जिल्हा खजिनदार परीक्षित देशमुख, व्यापारी असोसिएशनचे बाळकृष्ण बोरसे, प्रवासी संघटना व शहर काँग्रेसचे बालमुकुंद सत्ताळीस आणि युवक काँग्रेसचे चंद्रदीप अहिरे उपस्थित होते.