
मरणानंतर सरणही महाग! अंत्यविधीसाठी लुट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
मालेगाव (जि. नाशिक) : शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्ग (Coronavirus) कायम आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्युचे प्रमाण टिकून आहे. या कालावधीत अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते मदत करीत असताना कोरोना बाधिताच्या मृत्युनंतर अंत्यविधी करणारे काही दलाल व शव घेऊन जाणारे ॲम्बुलन्सधारक मयत कोरोनाबाधिताच्या नातेवाईकांकडून आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम घेऊन नागरिकांच्या भावनांशी खेळ करीत आहेत. मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे व मरणानंतर सरणही महाग झाले याची प्रचिती देणाऱ्या महाभागांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी सार्वजनिक नागरी सुविधा समितीने निवेदनाद्वारे केली आहे. (Demand for action against the looters for the funeral at Malegaon)
समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता. ७) मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, काही कोरोनाबाधित मृतांचे सहारा हॉस्पीटल ते अमरधामपर्यंत शव नेण्यासाठी ॲम्बुलन्सचालकांनी अडीच हजार रुपये घेतले. संबंधितांवर कोणाचेही नियंत्रण नाही. अनेकांच्या अंत्यविधीसाठी आठ ते दहा हजार रुपये घेतले जातात. श्रीरामनगर अमरधाममध्ये असे काही दलाल निर्माण झाले आहेत. या महाभागांची प्रशासनाने चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनासमवेत अंत्यविधीसाठी आठ ते दहा हजार रुपये दिलेल्या नातेवाईकांची नावे व मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. याचबरोबर रुग्णालयात कोरोना रुग्ण मयत झाल्यानंतर दिवसभर त्याचे शव रुग्णालयात ठेवले जाते. सायंकाळी निर्वाणीच्या वेळी नातेवाईकांना रुग्ण मयत झाल्याचे सांगितले जाते. यामुळे रात्री-अपरात्री अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईक हवालदिल होतात. त्यामुळे दलालांचे फावते. रुग्णालयांना याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर मोहित कडनोर, गणेश शार्दुल, दर्शन जाधव, राज बावीस्कर, सुनील बागुल, सौरभ बागुल, प्रा. किशोर चौधरी, शुभम पाटील, आकाश पगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा: नाशिकमध्ये ‘टॉसिलिझुब’ इंजेक्शनचा काळा बाजार! फार्मसीचे 2 विद्यार्थी ताब्यात
Web Title: Demand For Action Against The Looters For The Funeral At Malegaon Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..