esakal | व्‍हीआयपी वाहन क्रमांकाची मागणी जोरात! आरटीओला तब्‍बल 4 कोटींचा महसूल
sakal

बोलून बातमी शोधा

vip number

व्‍हीआयपी वाहन क्रमांकाची मागणी जोरात! आरटीओला तब्‍बल 4 कोटींचा महसूल

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : आपल्‍यासाठी लकी अर्थात, शुभ आकडा हा आपल्‍या वाहन क्रमांकात असावा, अशी अनेकांची धडपड असते. अशा काही आकर्षक क्रमांकांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शुल्‍क निर्धारित केले आहे.

२०२०-२१ मध्ये नागरिकांकडून व्‍हीआयपी क्रमांकाला मागणी

मागील वर्ष अनेकांसाठी आव्‍हानात्‍मक राहिले. कोरोना प्रादुर्भावामुळे व्‍यवसाय, उद्योगांवर परिणाम झाला, तर नोकरदारांना पगार कपात किंवा बेरोजगारीपर्यंतच्‍या संकटाचा सामना करावा लागला. अशा आर्थिक संकटाच्‍या काळातही आकर्षक आणि व्‍हीआयपी क्रमांकाची मागणी कायम राहिल्‍याचे आकडेवारीतून स्‍पष्ट होत आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०१२ या कालावधीत आकर्षक क्रमांकातून नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयास तब्‍बल तीन कोटी ९९ लाख पाच हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.


आकर्षक क्रमांकांतून वर्षभरात तब्‍बल चार कोटींचा महसूल

खरंतर गेल्‍या आर्थिक वर्षात दीर्घ कालावधी लॉकडाउनमुळे दुचाकी, चारचाकी वाहनांची दालने बंद होती. मात्र, परिस्‍थिती सुधारत असताना अनलॉकनंतर पुन्‍हा जनजीवन सुरळीत होताच, ऑटोमोबाईल क्षेत्रालाही बहर आली होती. विशेषतः चारचाकी वाहनांच्‍या मागणीत वाढ झाली होती. आपल्‍या वाहनाला आकर्षक किंवा आपल्‍या मर्जीचा क्रमांकच हवा, असा अनेकांचा आग्रह असल्‍याने व्‍हीआयपी क्रमांक योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. गत आर्थिक वर्षात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयास तब्‍बल तीन कोटी ९९ लाख पाच हजारांचा महसूल व्‍हीआयपी क्रमांकाच्‍या माध्यमातून प्राप्त झाला आहे.

चार हजार ७७० वाहनांचा योजनेत सहभाग
आपल्‍या पसंतीचा क्रमांक निवडताना वर्षभरात चार हजार ७७० व्‍यक्‍तींनी योजनेत सहभाग नोंदविला. विभागाकडून निर्धारित शुल्‍क अदा करत या व्‍यक्‍तींनी आपल्‍या पसंतीच्या क्रमांकाची निवड वाहनासाठी केली. यात सर्वाधिक ७९४ व्‍यक्‍तींनी या वर्षी मार्चमध्ये आकर्षक क्रमांक योजनेचा लाभ घेतला. गेल्‍या वर्षी एप्रिलमध्ये अवघे चार, मेमध्ये २४, जूनमध्ये २१०, जुलैत १३५, ऑगस्‍टमध्ये २०७ जणांनी आकर्षक क्रमांकाची निवड केली. यानंतर सण- उत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर वाहन विक्रीत वाढ होताना आकर्षक क्रमांक निवडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. सप्टेंबरमध्ये ३३५, ऑक्‍टोबरमध्ये ६२९, नोव्‍हेंबरमध्ये ६२९, डिसेंबरमध्ये ६३९, जानेवारीत ५१७, फेब्रुवारीत ६४१ वाहनांसाठी व्‍हीआयपी क्रमांकाची निवड केली.

दिवाळीच्‍या हंगामात अन्‌ मार्चएंडला सर्वाधिक महसूल
व्‍हीआयपी क्रमांक योजनेंतर्गत एप्रिल २०२० मध्ये ८४ हजार रुपये, मेमध्ये एक लाख ९५ हजार, जूनमध्ये १६ लाख १२ हजार, जुलैत ११ लाख ९२ हजार, ऑगस्‍टमध्ये १५ लाख २८ हजार, सप्‍टेंबरमध्ये २९ लाख ७५ हजार, ऑक्‍टोबरमध्ये ५३ लाख पाच हजार, दिवाळीत नोव्‍हेंबरमध्ये ६१ लाख दोन हजार रुपये महसूल मिळाला. डिसेंबरमध्ये ५१ लाख ९७ हजार, जानेवारीत ४१ लाख ५२ हजार, फेब्रुवारीत ५१ लाख ९७ हजार, तर आर्थिक वर्षाच्‍या शेवटा महिना मार्चमध्ये ६४ लाख पाच हजार रुपये महसूल व्‍हीआयपी क्रमांकातून आरटीओ कार्यालयास मिळाला.