NSK26H33814
जळगाव : लोकशाही मूल्यांना कमकुवत करणाऱ्या प्रवृत्ती आणि वाढत्या अराजकतेच्या विरोधात अभाविपतर्फे बुधवारी संविधान सन्मान मशाल यात्रा काढण्यात आली, त्यात सहभागी कार्यकर्ते.
------
अभाविपची ‘संविधान सन्मान मशाल यात्रा’
उपशीर्षक
देशातील अराजकतेविरोधात जळगावात आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : देशातील संवैधानिक संस्थांच्या स्वायत्ततेवर होत असलेले हल्ले, लोकशाही मूल्यांना कमकुवत करणाऱ्या प्रवृत्ती आणि वाढत्या अराजकतेच्या विरोधात आवाज उठवत भारतीय संविधानाचा सन्मान व लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बुधवारी (ता.२८) ‘संविधान सन्मान मशाल यात्रा’ काढण्यात आली.
रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली. टॉवर चौक आणि चित्रा चौक मार्गे मार्गक्रमण करत यात्रेचा समारोप शिवतीर्थ मैदान येथे झाला. संपूर्ण मार्गावर संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि अराजकतेच्या प्रवृत्तींना लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा संदेश देण्यात आला.
देशात कोणत्याही विचाराशी मतभेद असोत किंवा कोणत्याही प्रश्नावर संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असो, त्यावर तोडगा काढण्यासाठी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आणि लोकशाही प्रक्रियेचा अवलंब करणे आवश्यक आहे. संवैधानिक संस्थांचा सन्मान राखणे, लोकशाही मूल्यांचे जतन करणे आणि शांततापूर्ण मार्गाने आपली भूमिका मांडणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या यात्रेच्या माध्यमातून जळगावकरांना देण्यात आला.
चौकट
‘लोकशाही बळकट करा’
‘अराजकता थांबवा, लोकशाही बळकट करा’ या घोषवाक्याच्या माध्यमातून देशातील लोकशाही मूल्यांबाबत जागरूक राहण्याचे आणि अराजकतेच्या प्रवृत्तींविरोधात लोकशाही मार्गाने उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी अभाविपचे प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, राज्य विद्यापीठकार्य संयोजक अश्विनी ठाकूर, प्रदेश संघटनमंत्री श्री. सिद्धेश्वर लटपटे, सामाजिक कार्यकर्ते योगेश्वर गर्गे, जळगाव महानगर मंत्री आर्यन भालशंकर यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.
------------