esakal | Nashik : शासकीय कार्यालयांमध्ये डेंगी उत्पत्ती साधने
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue

Nashik : शासकीय कार्यालयांमध्ये डेंगी उत्पत्ती साधने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाच वर्षात डेंगी रुग्णांचा विक्रम मोडीत निघाल्यानंतर ॲक्शन मोडमध्ये आलेल्या मलेरिया विभागाने रहिवासी क्षेत्रात उत्पत्ती साधने शोधताना सरकारी कार्यालयांची झाडाझडती घेतली. त्यात एसटी बसडेपो, करन्सी नोट प्रेस, पोलिस वसाहत, जिल्हा रुग्णालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या आवारात डेंगीची उत्पत्ती स्थाने आढळल्याने नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर निमा व क्रेडाई या दोन उद्योग, व्यावसायिकांच्या प्रतिष्ठित संस्थांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

शहरात डेंगीसह चिकूनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. महापालिका रुग्णालयांमधील आकडेवारीपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहे. पाच वर्षातील सर्वाधिक आकडेवारी डेंगी व चिकूनगुनियाची समोर आल्याने या प्रकाराला राजकीय वळण लागले आहे. मलेरिया विभागाकडून धूर व औषध फवारणी करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य व मलेरिया विभागाकडून डेंगीची उत्पत्ती साधने शोधून ते नष्ट करण्याबरोबरच संबंधितांना नोटीस बजावली जात आहे. आतापर्यंत ७६६ नागरिक, संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयांच्या आवारातदेखील डेंगी उत्पत्ती स्थाने आढळून आल्या आहेत. त्यात पाथर्डी फाटा व सीबीएस येथील पोलिस वसाहत, जुने पोलिस आयुक्तालय या भागात डेंगी अळी उत्पत्ती साधने आढळल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या नावाने या कार्यालयांना नोटीस बजावताना स्वच्छतेचे निर्देश दिले आहेत.

करन्सी नोटप्रेस, परिवहन महामंडळालाही नोटीस

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, करन्सी नोट प्रेस, राज्य परिवहन महामंडळाच्या पेठ रोड येथील कार्यालयात डास उत्पत्ती साधने आढळल्याने त्या कार्यालय प्रमुखांना नोटीस बजावण्यात आली आहे. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांच्या परिसरात डेंगी उत्पत्ती साधने आढळल्याने औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निमा संस्थेला नोटीस बजावली आहे, तर बांधकामांच्या साइटवर उत्पत्ती साधने आढळल्याने बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेला नोटीस बजावण्यात आली आहे.

loading image
go to top