Cantonment Elections : ठाकरे गट संपूर्ण ताकदीनिशी भिडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deolali Cantonment Elections Thackeray group will fight with full strength nashik news

Cantonment Elections : ठाकरे गट संपूर्ण ताकदीनिशी भिडणार; इच्छुकांच्या मुलाखती

नाशिक : एप्रिल महिनाअखेरीस देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आठ प्रभागातील आठ जागांसाठी निवडणूक होत असून, निवडणुकीत ठाकरे गट (Thackeray group) संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. (Deolali Cantonment Elections Thackeray group will fight with full strength nashik news)

त्याअनुषंगाने शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास प्रारंभ झाला. इच्छुकांची गर्दी लक्षात घेता शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

शिवसेना भवनमध्ये इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, सचिन मराठे , महेश बडवे, देवळालीचे शहरप्रमुख साहेबराव चौधरी यांनी मुलाखत घेतल्या. प्रत्येक जागेसाठी २ ते ३ सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत.

आता त्यापैकी प्रत्येक प्रभागात एक उमेदवार देताना दांडगा जनसंपर्क आणि त्याची निवडून येण्याची क्षमता हे निकष विचारात घेतले जातील, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर म्हणाले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

२३ मार्च या एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरता येतील, तर २८ मार्च या एकाच दिवशी अर्ज मागे घेता येणार आणि ३० एप्रिलला निवडणूक असल्याने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसराला जणू राजकीय छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येक पक्षाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

मतदारांना हवे परिवर्तन : बडगुजर

या वेळी लोकांना परिवर्तन हवे असून त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाकडे मोठ्या आशेने बघत आहेत. भाजप आणि शिवसेना पक्षातून बाहेर पडलेल्या गद्दारांना (शिंदे गट) चांगला धडा शिकविण्याचा चंग मतदारांनी बांधला असून आमचे सर्व उमेदवार निवडून येणारच असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख बडगुजर यांनी व्यक्त केला.