देवळाली तोफखाना केंद्रात
२१ ला गोळीबाराचा सराव
नाशिक रोड, ता. १७ : देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे २१ नोव्हेंबरला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत दारूगोळ्याचा वापर करून तोफखाना व मैदानी गोळीबाराची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर तोफांच्या मारा क्षेत्रात येणाऱ्या नाशिक तालुक्यातील गावांमधील नागरिकांनी संबंधित परिसरात प्रवेश करू नये, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.
तोफखाना मुख्यालयाकडून अधिसूचित करण्यात आलेल्या ‘सी’ सेक्टरमध्ये हा सराव होणार आहे. यामध्ये दाडेगाव, शिंगवेबहुला, वडनेर आणि पिंपळगाव खांब या महसुली गावांच्या हद्दीतील काही भागांचा समावेश आहे. युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना सराव अधिनियम १९३८ मधील कलम १० (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार २१ नोव्हेंबरला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीने प्रवेश करू नये. तसेच इतर व्यक्तींना प्रवेश देऊ नये आणि पाळीव जनावरेही या क्षेत्रात नेऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्यास संबंधितांवर अधिनियमातील कलम १२ नुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल. या सूचनांचे उल्लंघन करून प्रवेश केल्यामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी शासनावर राहणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.