फोटो : B05100
डीजीपीनगर : मेन व्हॉल्व्हमधून ठिकठिकाणी सुरू असलेली पाणीगळती.
---
आठ महिन्यांपासून जलवाहिनीला गळती
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दीपालीनगरला पाण्याची नासाडी
डीजीपीनगर, ता. १७ : प्रभाग २३ मधील दीपालीनगर परिसरात ७ ते ८ महिन्यांपासून सुरू असलेल्या जलवाहिनीच्या गळतीमुळे दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या गंभीर समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन तसेच गळतीचे फोटो व व्हिडिओ पाठवूनही अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपमहानगरप्रमुख सरप्रीतसिंग बल यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. मात्र, संबंधित ठेकेदार काम करत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, स्थानिक नागरिकांनीही या समस्येबाबत अनेकदा तक्रारी केल्या असून स्थानिक नगरसेवकांच्याही निदर्शनास हा विषय आणून दिला आहे; परंतु त्यांच्याकडूनही अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीत नागरिक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करत असताना, दुसरीकडे महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ‘पाणी वाचवा’चे आवाहन करणाऱ्या प्रशासनाला प्रत्यक्षात सुरू असलेली ही पाण्याची नासाडी का दिसत नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने या जलवाहिनीची दुरुस्ती करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी; अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपमहानगरप्रमुख सरप्रीतसिंग बल यांनी दिला आहे.