धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H32077
धुळे ः धनगर समाजाच्या महामेळाव्याच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हा कारागृहासमोरील रस्त्यावर पाहणी करताना दीपक बोराडे, अप्पा खताळ, अमोल मासुळे, मनोज गर्दे आदी.
---
धनगर समाजाचा धुळ्यात
आक्रोश मोर्च्यासह महामेळावा
१५ ऑक्टोबरला आयोजन; दीपक बोराडे यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ ः अनुसूचित जमातीतील (एसटी) आरक्षणासाठी दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात १५ ऑक्टोबरला धुळ्यात उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाजाचा महामेळावा आणि आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत धनगर समाजाचा आक्रोश पोहोचविण्याचा आंदोलनाचा उद्देश आहे.
महामोर्चा व महामेळाव्याच्या तयारीसाठी श्री. बोराडे सोमवारी धुळ्यात दाखल झाले. क्यूमाईन क्लबसमोरील नियोजित मैदानाची त्यांनी पाहणी केली. या वेळी धनगर समाजाचे नेते अप्पा खताळ, नगरसेवक अमोल मासुळे, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपस्थित होते. धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून सुमारे एक लाख समाजबांधव या मेळाव्यात सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रातील बांधवांनी ‘अभी नही तो कभी नही’ ही भूमिका घेत या न्याय हक्काच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. बोराडे यांनी केले.
सरकारकडून चालढकल
केंद्राच्या अनुसूचीमध्ये ‘धनगड’ प्रवर्गाला एसटी आरक्षण असून, धनगर आणि धनगड एकच असल्याचा युक्तिवाद करत राज्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचे वचन दिले होते. मात्र, बारा वर्षे उलटूनही सरकारकडून केवळ चालढकल सुरू असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
महामेळावा पूर्णपणे अराजकीय असून, व्यासपीठावर केवळ श्री. बोराडे हेच उपस्थित राहून समाजबांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. बोराडे यांनी मेळाव्याच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, सोमवारी (ता. १२) दुपारी तीनला बर्वे स्मृती येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले.