अनूसुचित जमातीत धनगर समाजाचा समावेश होत नाही तोपर्यंत आंदोलन

अनूसुचित जमातीत धनगर समाजाचा समावेश होत नाही तोपर्यंत आंदोलन
Published on: 
मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन दीपक बोराडे यांचा बैठकीत इशारा; १५ ला मेळावा सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. ५ : केंद्र व राज्य शासनाने धनगर समाजाची घोर फसवणूक केली असून, त्यांना जागे करण्यासाठी राज्यभरात धनगर समाजाने रस्त्यावर उतरावे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे आवाहन धनगर समाज आरक्षण प्रणेते दीपक बोराडे यांनी येथे केले. येत्या १५ ऑक्टोबरला धुळे शहरात धनगर समाजाचा आरक्षण मोर्चा व मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या जनजागृतीसाठी श्री. बोराडे कार्यकर्त्यांसह धुळे जिल्ह्याचा दौरा करताना येथे आले होते. त्यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. युवा कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल व ताशाच्या गजरात स्वागत केले. त्यांच्यासोबत मेंढपाळ धनगर समाजाचे लखन रुपनर, प्रभारी सरपंच लखन ठेलारी, माजी सरपंच दंगल धनगर, समाजाचे उपाध्यक्ष मोहन धनगर, ज्येष्ठ कार्यकर्ते शांतीलाल धनगर, नंदू धनगर, भटू धनगर आदी उपस्थित होते. श्री. बोराडे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर देशात व महाराष्ट्रात रानोमाळी हिंडणाऱ्या भटक्या धनगर समाजाची सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती अत्यंत हलाखीची होती व आहे. राज्यघटनेत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले. परंतु, ‘धनगर’ऐवजी ‘धनगड’ असा शब्दप्रयोग आल्याने आजपर्यंत या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळू शकलेला नाही. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून समाज केंद्र व राज्य शासनाशी संघर्ष करीत आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची मतदार संख्या असलेला हा समाज कायम राजकारण्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडलेला आहे. तुम्ही आम्हाला मदत केल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवू असे राज्य शासनातील प्रमुखांनी १२ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत जाहीर सभेत आश्वासन दिले होते. आता मोठा कालावधी उलटला तरी ते आश्वासन पाळण्यात टाळाटाळ केली जात आहेत. मराठवाड्यातील जालन्यातून ठिणगीच्या रूपात सुरू केलेले हे निर्णायक आंदोलन आता वणव्याच्या स्वरूपात राज्यभर पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली पाहिजे. १५ ऑक्टोबरला धुळ्यातील मेळावा व मोर्चात जास्तीत जास्त समाज बांधवांनी महिला, तरुण मुलांसह सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रमोद धनगर यांनी सूत्रसंचालन केले.
Marathi News Esakal
www.esakal.com