त्र्यंबकेश्वरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण
---
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची कुशावर्त तीर्थाला भेट, त्र्यंबकराजाचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३० : सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरनगरी सज्ज झाली आहे. शनिवारी (ता. ३१) दुपारी १२ वाजून दोन मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होणार असून, शैव पंथाच्या दहा आखाड्यांचे प्रमुख या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत. याच दिवशी दुपारी तीनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कुशावर्त तीर्थाला भेट देऊन त्र्यंबकराजाचे दर्शन आणि पूजाविधी करतील. धार्मिक परंपरेचा मान, आखाड्यांची उपस्थिती आणि राष्ट्रपतींचा दौरा यांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडींचा संगम घडणार असून, दोन्ही सोहळे निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारीला अंतिम स्वरूप दिले आहे.
धर्मध्वजारोहण हा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यामुळे धार्मिक विधींचे पावित्र्य जपतानाच निर्धारित वेळेत कार्यक्रम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती यांच्या दौऱ्यांसाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था आणि प्रोटोकॉल निश्चित करण्यात आले असून, दोन्ही कार्यक्रमांमध्ये समन्वय राखण्यासाठी विविध विभागांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रपती मुर्मू यांच्या कुशावर्त तीर्थ भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली. राष्ट्रपती त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन पूजाविधी करणार असल्याने संबंधित धार्मिक प्रक्रिया आणि सुरक्षाव्यवस्थेचा मेळ घालण्यात येत आहे. कोणते पुरोहित पूजाविधी करणार, कोणते मंत्रोच्चार होतील, पूजेसाठी कोणते साहित्य लागेल आणि विधींचा क्रम कसा असेल, याची सविस्तर माहिती प्रशासनाने घेतली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे पूजाविधीसाठी सुमारे १५ मिनिटांचा कालावधी नियोजित करण्यात आला. त्यानुसार राष्ट्रपतींच्या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले जात आहे. धार्मिक विधींचे पावित्र्य कायम राखतानाच राष्ट्रपतींच्या सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्यावर प्रशासनाचा भर राहील.
दहा आखाड्यांच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहण
शनिवारी दुपारी १२ वाजून दोन मिनिटांनी होणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी शैव पंथाच्या दहा आखाड्यांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आखाड्यांच्या प्रमुखांचे आगमन, स्वागत, आसनव्यवस्था आणि ध्वजारोहणस्थळावरील प्रवेश यांचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले. आखाड्यांच्या धार्मिक परंपरा आणि मानमरातबाला प्राधान्य देऊन सोहळा पार पाडण्याची तयारी सुरू आहे. साधू-महंत, निमंत्रित मान्यवर आणि भाविकांची उपस्थिती लक्षात घेता कार्यक्रमस्थळी गर्दीचे नियमन करणेही महत्त्वाचे ठरेल. धार्मिक विधींच्या वेळी अनावश्यक गर्दी होऊ नये आणि कार्यक्रमाच्या नियोजनात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गर्दी व्यवस्थापनाचे आव्हान
त्र्यंबकेश्वरची भौगोलिक रचना, अरुंद रस्ते, मंदिर परिसरातील मर्यादित जागा आणि कुशावर्त तीर्थाकडे जाणारे मार्ग यांमुळे गर्दी व्यवस्थापनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आखाड्यांचे प्रमुख, साधू-महंत, निमंत्रित मान्यवर आणि सर्वसामान्य भाविक यांच्या हालचालींचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रवेश नियंत्रण, गर्दीच्या प्रवाहाचे नियमन आणि विविध ठिकाणांवरील समन्वय यावर भर दिला जातो.