पान तीन
--------------
धोंडबार-औंढेवाडी मार्गासाठी १० कोटीची मान्यता
आमदार कोकाटे, उदय सागळेंकडून पाठपुराव्याचे दावे
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १४ : धोंडबार-औंढेवाडी मार्गासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास मान्यता दिली. आमदार माणिकराव कोकाटे, भाजप नेते उदय सांगळे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. दोघांकडूनही या कामाचे दावे करण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही गटांकडून दावे करण्यात येत असले तरी अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याने या गावातून त्याचे स्वागत केले जात आहे.
सांगळे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार गणेश गिते यांची त्यासाठी मदत झाल्याची माहिती दिली. यावेळी भाजपचे सुनील माळी बहिरु दळवी, सजन सांगळे, गटनेते अनिल सरवार, नगरसेविका आशा कर्पे, विनोद शितोळे, युगंधर वाजे, देवा वाजे, धोंडबार व औंढेवाडीचे ग्रामस्थ राजेश शिंदे, दीपक खेताडे, राहुल साबळे, गणेश खेताडे, सिध्दार्थ खेताडे आदी उपस्थित होते.
धोंडबार व औंढेवाडी येथील रस्त्यासाठी आदिवासी बांधवांनी दीड महिन्यापासून आंदोलन सुरु केले होते. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन झाले. त्यानंतर सिन्नर-घोटी महामार्ग रोखण्यात आला होता.
आमदार कोकाटे यांच्या कार्यालयाकडूनही याबाबत केलेल्या पत्र्यवहाराची माहिती देण्यात आली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना दिलेल्या पत्राची माहिती देत हा रस्ता होणे गरेजेचे असून १० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली होती.