धुळे : टुडे पान २ साठी..अँकर
--
फोटो क्रमांक : 33670
धुळे : उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत झालेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीदरम्यान उपस्थित परीक्षार्थी आणि केंद्राची पाहणी करताना शिक्षण अधिकारी प्रतिभा ठाकूर.
--
जिल्ह्यातील आजी- आजोबांनी दिली साक्षरता परीक्षा
--
उल्हास नवभारत अभियानात २४ हजार प्रौढांची जिद्द; वाचन-लेखनाचा सोहळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : शिकण्याला वयाचे बंधन नसते ही म्हण जिल्ह्यातील आजी- आजोबांनी खरी करून दाखवली. आयुष्याच्या उत्तरार्धात हातात पाटी-पेन्सिल धरत, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य घेऊन हजारो प्रौढांनी साक्षरतेचा धडा गिरवला. केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत २०२६-२७ मधील पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्ह्यातील एक हजार ११५ केंद्रांवर उत्साहात पार पडली.
-
या परीक्षेत २४ हजार ७४० असाक्षर आजी- आजोबा आणि प्रौढांनी सहभाग नोंदवून साक्षरतेची नवी पहाट अनुभवली. यात १३ हजार ६९४ महिला आणि ११ हजार ४६ पुरुषांचा समावेश होता. वयाच्या या टप्प्यावरही स्वतःचे नाव लिहिणे, आकडेमोड करणे आणि अक्षरे वाचणे शिकणाऱ्या या परीक्षार्थींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. २३ हजार ८१९ जणांनी मराठी माध्यमातून तर ९२१ जणांनी उर्दू माध्यमातून ही परीक्षा दिली.
-
जिल्ह्यात धुळे शहर, साक्री, शिंदखेडा, धुळे तालुका आणि शिरपूर या भागात या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. सर्वाधिक ४५१ केंद्रे साक्री तालुक्यात, शिरपूरमध्ये ३३०, धुळे तालुक्यात १६३, शिंदखेड्यात १३३ आणि धुळे शहरात ३८ केंद्रे उभारण्यात आली होती. सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी एकत्र येत या परीक्षा केंद्रांचे रुपांतर साक्षरतेच्या सोहळ्यात केले. भरारी पथकांद्वारे प्राथमिक, माध्यमिक व योजना शिक्षणाधिकारी, तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आणि मनपा प्रशासन अधिकाऱ्यांनी विविध परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देऊन या ज्येष्ठांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. या अभियानाचा प्रभाव पाहण्यासाठी राज्यस्तरावरून शिक्षण संचालक नंदकुमार बेडसे यांनी भाडणे (ता. साक्री) येथील केंद्राला भेट दिली. पुरणेपाडा (ता. धुळे) जिल्हा परिषद शाळेत उपसंचालक पुष्पावती पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून आजी- आजोबांशी गप्पा मारत त्यांचा उत्साह द्विगुणित केला. तर शिक्षणाधिकारी प्रतिभा ठाकूर यांनी नकाणे रोड येथील केंद्राला भेट देऊन परीक्षार्थींना प्रोत्साहन दिले.