धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर
--
धुळे जिल्ह्यास साडेनऊ कोटींचा कृषी लक्षांक मंजूर
-
शेतकऱ्यांना फलोत्पादनासह राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी अर्जाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०२६- २०२७ या वर्षासाठी जिल्ह्याला विविध घटकांसाठी ९ कोटी ४४ लाख रुपयांचा भरीव आर्थिक लक्षांक प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर त्वरित अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी केले आहे.
दोन्ही योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधा व पिकांच्या विस्तारासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत फळे, फुले व मसाला पिकांचा क्षेत्रविस्तार, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, हरितगृह (पॉलीहाऊस), शेडनेट हाऊस, कांदाचाळ, पॅक हाऊस आणि पीक आच्छादन (मल्चिंग) आदी घटकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल.
-
१४-१
कृषी विकास योजना
राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ उभारणी तसेच डाळिंब व द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी ‘अँटी हेलनेट कव्हर’ (गारांपासून संरक्षणासाठी जाळी) या घटकांचा समावेश आहे. शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार विविध घटकांसाठी अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ती अशी : कांदाचाळ उभारणी- २५ व ५० टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी प्रतिटन चार हजार रुपये अनुदान देय आहे. शेततळे अस्तरीकरण- वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी कमाल ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. अँटी हेलनेट कव्हर- डाळिंब व द्राक्ष बागांसाठी प्रतिचौरस मीटर १०६.१६ रुपये अनुदान दिले जाईल.
१४-१
अर्ज कुठे व कसा?
या योजनांचा लाभ सर्वसाधारण प्रवर्गासह अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. सर्व पात्र व इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर आपले अर्ज ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.