राम भदाणे : KPD26B13579
-------
कृषीपंपांच्या वीजेचा प्रश्न शंभर टक्के सुटणार
आमदार राम भदाणे : धुळे तालुक्यातील ट्रान्सफॉर्मरसाठी ११ कोटी
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ३१ : धुळे तालुक्यातील कृषीसह गावपाड्यातील वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शेतीशिवारातील वीजेचा प्रश्न सोडवून सिंचन क्षेत्रात वाढ करायची आहे. त्यामुळे शेतकरी सक्षम होईल. आतापर्यंत दीडशे नवे ट्रान्सफॉर्मर बसविले गेले आहेत. वीज निरंतरमधून चार कोटीतून नव्याने दीडशे ट्रान्सफॉर्मर आणि दुष्काळी योजनेतून विभागाला सात कोटीतून ट्रान्सफॉर्मर खरेदी करता येणार आहेत. म्हणजेच धुळे तालुक्यासाठी सुमारे अकरा कोटीतून वीजेची समस्या शंभर टक्के निराकरण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे आमदार राम भदाणे यांनी सांगितले.
आमदार भदाणे यांनी सांगितले, की दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी नियमित, अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी २० कोटींपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६- २७ अंतर्गत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या योजनेतून ही कामे केली जाणार आहेत.
दोनशे वीस ट्रान्सफॉर्मर
धुळे तालुक्याला वीज निरंतर योजनेतून १५० ट्रान्सफॉर्मर आणि दुष्काळग्रस्त भागातील सिंचनासाठी एका डिव्हिजनसाठी ७ कोटी रुपयांतून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर मिळणार आहेत. एकंदरीत सुमारे ११ कोटींची तरतूद धुळे तालुक्यासाठी करून घेतली आहे.
स्पेशल डिझाईन
धुळे तालुक्यासाठी उपलब्ध या विशेष निधीतून नादुरुस्त, ओव्हरलोड ट्रान्सफाॅर्मर बदलण्यासाठी नवीन वितरण रोहित्र उपलब्ध करून दिली जातील. कृषी वीज वाहिनीवरील घरगुती ग्राहक आणि शेतातील घरांना चोवीस तास सुरळीत वीज मिळण्यासाठी सिंगल फेज आणि थ्री-फेजचे नवीन ‘स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर’ बसवले जाणार आहेत. लांब अंतराच्या वीज वाहिन्यांवरील कमी दाबाच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नवीन कॅपॅसिटर बँका खरेदी करणार आहोत.