धुळे : टुडे पान २ साठी...मेन
---
फोटो क्रमांक : 35068
धुळे : दिवाळी सण आटोपल्यानंतर सासरी परतणाऱ्या महिला व नोकरी-व्यवसायाच्या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची मध्यवर्ती बसस्थानकावर झालेली गर्दी. (छायाचित्र : गोरख गर्दे)
---
दिवाळी सरताच परतीच्या प्रवासाची लगबग
बसस्थानकावर गर्दी; दिवाळीत एसटी मालामाल, धुळे विभागाला विक्रमी उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : सण आटोपल्यानंतर सासरी परतणाऱ्या महिला प्रवाशांची आणि नोकरी-व्यवसायाच्या शहरांकडे जाणाऱ्या नागरिकांची बसस्थानकावर मोठी लगबग सुरू झाली आहे. यामुळे बसस्थानक गर्दीने फुलले आहे. दुसरीकडे दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) धुळे विभागाला यंदा विक्रमी उत्पन्न मिळाले. केवळ भाऊबीजेच्या एकाच दिवशी धुळे विभागाने सवलतींसह दोन कोटी एक लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले.
लक्ष्मीपूजनापासूनच धुळे बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. सणासाठी मूळ गावी आलेले कुटुंबीय आणि भाऊबीजेसाठी माहेरी गेलेल्या महिला मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करत होत्या. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन धुळे विभागाने आधीच विशेष नियोजन केले होते. भाऊबीजेच्या दिवशी विभागाच्या ७३५ बसच्या माध्यमातून तीन लाख सहा हजार किलोमीटरची वाहतूक झाली. यातून सवलती वगळता एक कोटी २५ लाख रुपये, तर शासकीय सवलतींसह दोन कोटी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. लांब पल्ल्याच्या मार्गांवर नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यात पुणे मार्गावर नियमित ४५ बसव्यतिरिक्त २३ जादा बस, तर सुरत आणि अहमदाबाद मार्गावर नियमित सहा बसव्यतिरिक्त दहा जादा बसचा समावेश होता. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक मार्गावर दर तासाला इलेक्ट्रिक बस, तर जळगावसह अन्य प्रमुख शहरांसाठी गर्दीनुसार अतिरिक्त बससेवा देण्यात आली.
ग्रामीण भागात गैरसोय
परतीच्या प्रवाशांसाठी धुळे विभागाने जादा बसचे नियोजन केले असले तरी गर्दीच्या तुलनेत बसस्थानकात बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. अनेक प्रवाशांना उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या बस ठराविक वेळेतच असल्याने बस फलाटावर येताच जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची धावपळ उडत आहे. काही ग्रामीण भागातील थांब्यांवर उन्हात तासनतास ताटकळूनही बस न मिळाल्याने आणि खासगी वाहनांतही जागा नसल्याने अनेकांनी नाईलाजाने दुचाकीचा आधार घेतला. दुचाकीवर पुढे लहान मूल, मध्ये चालक आणि मागे सामानांच्या पिशव्या घेऊन बसलेली पत्नी असे धोकादायक प्रवासाचे चित्र अनेक मार्गांवर पाहायला मिळाले.
---
१४-१
चौकट
परतीच्या प्रवासासाठी धावपळ
भाऊबीज आटोपल्यानंतर आता माहेरी आलेल्या महिलांचा सासरी परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तिकीट दरात सवलत असल्याने बहुतांश महिला व मुलींनी एसटी प्रवासालाच पसंती दिली आहे. तसेच पुणे, मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले नागरिकही आता पुन्हा कामाच्या शहरांकडे परतू लागले आहेत. यामुळे शहरातील बसस्थानक, प्रवासी थांबे, चौक आणि फाट्यांवर सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.