धुळे ः टुडे १ साठी
---
फोटो क्रमांक ः 34985
धुळे ः मध्यवर्ती बसस्थानकात मध्य प्रदेशच्या बसवर कारवाई करताना आरटीओ, एसटीचे संयुक्त पथक.
---
‘एमपी’च्या बसला १२ हजारांचा दंड
विनापरवाना आंतरराज्य वाहतुकीवर धुळ्यात धडक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ ः येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात विनापरवाना आंतरराज्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील खासगी बसवर राज्य परिवहन (एसटी) महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) संयुक्त पथकाने शुक्रवारी (ता. १३) धडक कारवाई केली. या कारवाईत संबंधित बसचालक व मालकाकडून साडेबारा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
धुळे- इंदूर मार्गावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी मध्य प्रदेश परिवहन, अशी दर्शनी भागावर नोंद असलेली बस (एमपी ४६, झेडडी ७६९४) शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास धुळे मध्यवर्ती बसस्थानकात दाखल झाली होती. या बसच्या काचेवर ‘इंदूर’ असा मार्गदर्शक फलकही लावलेला होता. एसटी महामंडळ व आरटीओच्या संयुक्त पथकाने या बसची तपासणी केली असता चालकाकडे आंतरराज्य प्रवासी वाहतुकीचा वैध परवाना नसल्याचे समोर आले. शिवाय नियमांनुसार आवश्यक असलेले प्रतिस्वाक्षरीपत्र (सीएस), अधिकृत भाडे तक्ता, वेळापत्रक आणि ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) यापैकी एकही कागदपत्र चालकाकडे उपलब्ध नव्हते. तसेच चालक गणवेशात नसल्याचेही तपासणीत निदर्शनास आले.
पथकाची कारवाई
नियमांचे उल्लंघन करून अवैध प्रवासी वाहतूक केल्याची गंभीर दखल घेत संयुक्त पथकाने बसवर दंडात्मक कारवाई करत १२ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईप्रसंगी एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, आगार व्यवस्थापक संदीप निकम, संजय अवस्थी, संतोष काळे, आरटीओचे श्रीकांत केदार, संदेश माने यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे अवैध आंतरराज्य प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.