फोटो क्रमांक ः 34519
धुळे : पारोळा रोडवरील बाजार समितीत बेकायदेशीरपणे कोंबलेल्या गोवंशाची सुटका केल्यानंतर उपस्थित पोलिस निरीक्षक विनोद पाटील, विकी परदेशी, ॲड. रोहित चांदोडे व समर्थक.
---
धुळे बाजार समितीतून गोवंशाची सुटका
---
गोरक्षक अन् लोकप्रतिनिधी समर्थकांची धाड; पोलिसांकडून नियंत्रण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : वसूबारस आणि दिवाळीच्या तोंडावर कत्तलीच्या उद्देशाने वाहनांमध्ये दाटीवाटीने कोंबून ठेवलेल्या सुमारे १०० ते १५० गोवंशाची सुटका करण्यात गोरक्षक आणि लोकप्रतिनिधी समर्थकांना यश आले. मंगळवारी (ता. ४) रात्री आठ ते दोनदरम्यान येथील पारोळा रोडवरील बाजार समितीच्या आवारात ही धडक कारवाई करण्यात आली.
बाजार समितीचा मंगळवारी नियमित बाजाराचा दिवस होता. आवारात उभ्या असलेल्या ३ ते ४ संशयास्पद वाहनांमध्ये इअर टॅग (अधिकृत नोंदणी) नसलेले गोवंश कोंबल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आले. याबाबत गोरक्षक रोहित विभांडीक, प्रणिल मंडलीक, अक्षय चौधरी, अक्षय हाके यांनी तत्काळ आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात भाजपचे विकी परदेशी, नगरसेवक ॲड. रोहित चांदोडे, चिरायू अग्रवाल, मोहन टकले, किरण अहिरे, संतोष परदेशी, अमोल सूर्यवंशी, अमित भोसले, पुक्या साळवे, भटू ठाकरे, नितीन शिंदे व कार्यकर्त्यांची टीम रात्री आठला बाजार समितीत पोहोचली.
पोलिसांचा बंदोबस्त
कोणताही अनुचित प्रकार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून विकी परदेशी यांनी आझादनगर पोलिस ठाण्याला बाजार समितीमधील स्थितीची पूर्वकल्पना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक विनोद पाटील ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गोरक्षक आणि कार्यकर्ते दाखल होताच व्यापारी व संशयित कसाई वाहने सोडून पसार झाले. बाजार समिती प्रशासनाकडे या बेकायदेशीर गोवंशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नव्हती. वाहनात कोंबलेल्या सर्व गोवंशाची सुटका करून त्यांची रवानगी सुरक्षितपणे स्थानिक गोशाळेत करण्यात आली. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे. वसूबारसपूर्वीच गोवंशाला जीवदान मिळाल्याने शहरातील गोभक्तांनी समाधान व्यक्त केले.