धुळे : टुडे पान २ साठी..अवतीभवती
--
धनदाई नगरात
स्वच्छता अभियान
धुळे : शहरातील प्रभाग एक मधील धनदाई नगर सांस्कृतिक व आध्यात्मिक मित्रमंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला धनदाई नगरातील गणपती मैदान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात परिसरातील उत्साही युवक आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र आले होते. या मोहिमेदरम्यान मैदानावरील गोळा झालेला कचरा, झाडांची वाळलेली पाने, प्लास्टिक व अन्य टाकाऊ वस्तू व्यवस्थित गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याबाबत हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे. प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे, भैय्यासाहेब पाटील, आर. बी. सोमवंशी, बी. आर. बोरसे, संदीप पाटील, प्रा. महेश पाटील, निखील चौधरी, रवींद्र मोरे, सुमित धगधगे, शरद बिलारीस, शुभम ठाकरे, स्पंदन पाटील आदी सहभागी झाले होते.
--
बालाजी रथोत्सवात
महाप्रसाद वाटप
धुळे : अनेकविध सामाजिक उपक्रमांसाठी अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब धुळे कनेक्टतर्फे यंदाही बालाजी रथोत्सवात उपस्थित भाविकांसाठी पोहे, चहापान व शीतल पेयजल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. नगरपट्टीवरील जैन साडीसमोर उभारण्यात आलेल्या शामियान्यात हजारो भक्तांनी या सेवेचा लाभ घेतला. माजी प्रांतपाल आशिष अजमेरा, डीजीएन आशिष पटवारी, असिस्टंट गव्हर्नर श्वेता शहा देशपांडे, क्लस्टर सेक्रेटरी ॲड. संजय शिंपी आणि डिस्ट्रिक्ट क्लब पब्लिक इमेज को-चेअर कमर शेख यांच्या मार्गदर्शनात उपक्रम झाला. अध्यक्ष संतोष बिरारी, प्रोजेक्ट चेअरमन महावीर सुराणा, सचिव संजय देवरे व पब्लिक इमेज चेअर पवन खानकरी यांनी संयोजन केले. अमित ठक्कर, चेतन गांधी, संजय जैन, शाम अग्रवाल, बंटी चौधरी, पराग श्रॉफ, नितेश सराफ, सचिन बोरसे, दीपक भावसार, प्रशांत जैन, सुशील राका, विलास वाणी, डॉ. विशाल वाणी व आनंद कुलकर्णी आदी क्लब सदस्यांनी सहभाग घेतला.
--
एकवीरा विद्यालयाचे
शालेय स्पर्धेत यश
धुळे : जिल्हा मनपास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत एकवीरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिहेरी उडी स्पर्धेत वैभवी पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. थाळीफेकमध्ये गार्गी बाविस्कर आणि उंच उडीत कृष्णा पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवत विभाग स्तरावर निवड मिळवली. तसेच मुलींच्या ४×१०० रिले स्पर्धेत प्रांजल खैरनार, वैभवी पाटील, तनूश्री पाटील व जान्हवी पाटील यांनी आणि १४ वर्षांखालील मुलांच्या ४×१०० रिले स्पर्धेत भूषण पाटील, अंशुमन बागले, मनिष पाटील व वेदांत सूर्यवंशी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. याशिवाय प्रांजल खैरनार हिने गोळाफेकमध्ये आणि गार्गी बाविस्कर हिने सायकलींगमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक निंबा पाटील व सुवर्णा साळूंके, चेअरमन प्रशांत वाघ, सचिव प्रदीप वाघ, मुख्याध्यापिका आशालता भदाणे आदीनी कौतुक केले.
--
देवरे तंत्रनिकेतनमध्ये
शिक्षक-पालक सभा
धुळे : श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग आणि स्टुडंट्स असोसिएशनतर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक- पालक सहविचार सभा नुकतीच पार पडली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, करिअरची पूर्वतयारी, प्लेसमेंटच्या संधी, ऑनलाईन परीक्षांचा अभ्यासक्रम, वर्गातील उपस्थितीचे महत्त्व आणि कौशल्य विकास यावर पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्राचार्य प्रा. संजय हिरे, विभाग प्रमुख प्रा. महेंद्र पाटील, कार्यशाळा अधीक्षक प्रा. सुधीर चौधरी आणि रजिस्ट्रार प्रा. हेमंत पाटील उपस्थित होते. प्रा. प्रशांत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शोएब काझी व सहकाऱ्यांनी संयोजन केले.
--
तरुणांसाठी योग
ध्यानाची गरज
धुळे : मोराणे (ता. धुळे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘योग व ध्यान नशामुक्त युवक विकसित भारत’ १०० दिवस संकल्प कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाभ्यास ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तरुणांनी नियमित योगधारणा करून शरीर व मन तंदुरुस्त ठेवावे आणि व्यसनमुक्त जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. योग प्रशिक्षक प्रा. डॉ. जितेंद्र भामरे आणि योग अभ्यासक इंजिनिअर विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम, ध्यानधारणा व योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह स्पष्ट करून दाखवले. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. फरीदा खान, डॉ. राहुल आहेर, डॉ. सुदाम राठोड आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी संयोजन केले. डॉ. राहुल आहेर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुदाम राठोड यांनी आभार मानले.