धुळे : मुख्य अंकातील पानासाठी...
--
फोटो क्रमांक : 31507
खर्दे (ता. शिरपूर) : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत गावात स्वच्छता करताना ग्रामस्थ.
--
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत सामूहिक श्रमदान
--
स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न; गावागावात मोहीम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ हा विशेष उपक्रम झाला. लोकसहभागाच्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांची निर्मिती करणे, तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. यास जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाभरात हे अभियान प्रभावीपणे राबवले गेले. या उपक्रमांतर्गत एक ऑक्टोबरला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यात गावातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणे, शाळा व महाविद्यालयीन परिसर, रस्ते, चौक, बस स्थानके, जलस्रोत परिसराची सफाई केली गेली. सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर स्वच्छ केला गेला. केवळ सफाईवर भर न देता कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे, ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे, परिसर कायम स्वच्छ राखणे आणि आरोग्याला पूरक ठरणाऱ्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी दैनंदिन जीवनात अंगीकारणे या विषयांवर नागरिकांमध्ये मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. स्वच्छता ही केवळ एका दिवसाची किंवा प्रशासनाची मोहीम नसून ती प्रत्येक गावाची आणि प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी बनली पाहिजे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या मोहिमेत अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट, युवक, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी सहभागी झाले होते.
मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजन पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनात चारही तालुक्याच्या गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तज्ज्ञ सल्लागार, ग्रामपंचायत अधिकारी, बीआरसी, सीआरसी यांनी परिश्रम घेतले.