NSK26H31366
धुळे : जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पाच लाखांचा धनादेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करताना बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे.
----------------
दुष्काळग्रस्तांसाठी जिल्हा बँकेची पाच लाखांची मदत
संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांच्या वतीने धनादेश सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ४ : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पाच लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रविवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धुळे दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्यासह पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते हा पाच लाख रुपयांचा धनादेश मंत्री बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी हे देखील उपस्थित होते. या मदतीमध्ये बँकेच्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीचा भत्ता, तसेच बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या एका दिवसाच्या पगाराचा समावेश आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा बँकेने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करण्यात आले.