धुळे ः टुडे १ साठी.....मास्क हेडला नेव्हीगेशन करणे....
--
३० कोटींच्या बनावट
नोटांची निव्वळ अफवा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ : धुळे तालुक्यात ३० कोटी रूपयांच्या बनावट नोटा सापडल्या असून, तालुका पोलिस ठाण्याकडून संशयितांची चौकशी केली जात असल्याची चर्चा जिल्ह्यात बुधवारी (ता. २१) उसळली. नागमणी (बनावट प्रकार), दुतोंडी मांडूळ तस्करीमुळे देशातील बहुचर्चित अजनाळे (ता. धुळे) येथे हा प्रकार उजेडात आला असून एकाची चौकशी केली जात असल्याचीही चर्चा होती. यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सांगितले, की ३० कोटींच्या बनावट नोटा आढळल्याची निव्वळ अफवा आहे. ती संबंधित गावातूनच उठविण्यात आली. परंतु, सोशल मीडियावर बनावट नोटांबाबत पोस्ट व्हायरल झाल्यामुळे या अफवेला खतपाणी मिळाले. प्रत्यक्षात अशा कुठल्याही बनावट नोटा आढळलेल्या नाहीत. अजनाळे येथील एका चव्हाण नामक संशयिताला एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याशी निगडीत ही अफवा पसरविण्यात आल्याची चर्चा विविध पातळीवरून होत होती.
--
सट्टा अड्ड्यावर छापा;
तीन संशयित ताब्यात
धुळे, ता. २१ : शहरातील पाच कंदील परिसरातील सट्टा अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आठ हजार ५७० रुपये रोख आणि कल्याण सट्ट्याचे पुस्तक जप्त केले. शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. त्यात पाच कंदिलामागील एका बोळीत पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या ठिकाणी कारवाई केली. पोलिसांना पाहून काही जण पळून गेले. मात्र, सट्टा चालविणाऱ्यासह तिघांना ताब्यात घेतले. याबाबत हवालदार हिमांशू ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार किरण बन्सीलाल सोनार (रा. क्रांतीनगर, विद्यावर्धिनी महाविद्यालयामागे), लक्ष्मण सटवाजी गवळी (रा. गोकुळनगर, शासकीय दूध डेअरीमागे) आणि अजित बाबुराव राणा (सट्टा अड्ड्याचा मालक, रा. गल्ली क्रमांक २, धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.