32720
धुळे : जिल्हा व सत्र न्यायालयासमोर काळ्या फिती लावून निषेध नोंदवताना न्यायालयीन कर्मचारी.
--
न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे ‘काळी फित‘ आंदोलन
समान काम, समान वेतनासाठी आंदोलन; बेमुदत संपाचा इशारा
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील विविध न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १६) काळ्या फिती लावून कामकाज केले. मुंबई उच्च न्यायालय आणि खंडपीठातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. शासनाकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या नियोजनानुसार आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १६ सप्टेंबरला काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ठरल्यानुसार हे आंदोलन सुरू आहे. मागण्यांवर निर्णय न झाल्यास पाच नोव्हेंबरला राज्यातील न्यायालयीन कर्मचारी सामूहिक रजा घेऊन आंदोलन करणार आहेत. त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास १७ नोव्हेंबरपासून राज्यातील सुमारे ३४ हजार कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. शनिवारी (ता. १७) सेवानिवृत्त कर्मचारीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. या वेळी क्युमाईन क्लब येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत एकदिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनात जिल्हा न्यायालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील जिरे, उपाध्यक्ष मनोज मीठसागर, सचिव मनोज अहिरराव, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कुळकर्णी, उपाध्यक्ष नीलिमा भालेराव, बेलिफ संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत डोमाडे, उपाध्यक्ष संजय माळी, वर्ग-ड संघटनेचे अध्यक्ष पंकज पुणेकर यांच्यासह कपिल चांदणे, सचिन सोनवणे, पुष्पक ठाणगे, प्रशांत पाटील, सचिन ताडगे, किरण बाबर, प्रवीण बागूल, मिलिंद माळी, हेमंत माळी आदींसह सदस्य सहभागी झाले.