धुळे ः टुडे १ साठी...........संक्षीप्त व हेड मास्कसाठी
--
साक्री तालुक्यातून
तरुणीचे अपहरण
धुळे ः विटाई (ता. साक्री) येथील १९ वर्षीय तरुणी घरात कोणास काही न सांगता निघून गेली. शोध घेऊनही ती आढळली नाही. तिला अज्ञात व्यक्तीने डांबून ठेवण्याच्या इराद्याने पळवून नेल्याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रदीप शिरसाट तपास करत आहेत.
---
कुसुंब्यात भरदिवसा
मोटारसायकल चोरी
धुळे ः कुसुंबा (ता. धुळे) येथील गल्ली नंबर चारमधील सार्वजनिक जागेवरून दीपक प्रकाश बोरसे यांची पंचवीस हजार किमतीची मोटारसायकल चोरट्याने लांबवली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार वायसे तपास करत आहेत.
---
पाच लाखांसाठी
विवाहीतेचा छळ
धुळे : ‘माहेरहून पाच लाख रुपये व कार घेऊन ये, नाही तर नांदवणार नाही’, अशी धमकी देत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याची घटना आझादनगर परिसरातील अंबिका नगर येथे घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आझादनगर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध अत्याचाराचा व विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रफिक पठाण तपास करत आहेत.
---
भोनगाव शिवारात
तरुणाचा अपघात
धुळे ः भोनगाव (ता. साक्री) परिसराजवळ विजय जयवंतराव रौदळ यांच्या शेताजवळ बकऱ्या चारत असलेला १८ वर्षीय तरुण तुषार सुनील पवार यास भरधाव मोटारसायकलचालकाने (एमएच १८-७७५३) हलगर्जीपणे वाहन चालवून धडक दिली. यात तरुण गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी याप्रकरणी वडील सुनील गुलाब पवार (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक संजय मावची तपास करत आहेत.
---
नंदाणे शिवारातून
पाणीमोटार चोरीस
धुळे ः नंदाणे (ता. धुळे) शिवारातून चोरट्याने चार हजार किमतीची पाण्याची मोटार नेली. या प्रकरणी अनुसयाबाई रामा भिल (वय ५५, रा. सोनगीर) यांच्या तक्रारीवरून सोनगीर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
---
कंटेनरच्या धडकेत
पादचारी तरुण ठार
धुळे : शहरातील युनिटी सर्कल ते चाळीसगाव चौफुलीकडे जाणाऱ्या मार्गावर संगम स्टीलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या शाहरुख जहीर शेख या तरुणास अज्ञात कंटेनरचालकाने (जीजे ०५, सीडब्लू ६१६६) बेदरकारपणे वाहन चालवून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने या तरुणाचा मृत्यू झाला असून, चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला. जावेद हुसेन तांबोली यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक विवेक पवार तपास करत आहेत.
---
प्रकृती बिघडल्याने
एक जणाचा मृत्यू
धुळे : प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या इंदल सुभाष राठोड (रा. चांदे तांडा, ता. धुळे) यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी (ता. १४) रात्री त्यांच्या पोटात पाणी होऊन प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
---
किडनीच्या आजाराने
वृद्धेचा मृत्यू
धुळे : येथील वडजाई रोड परिसरातील काझी प्लॉट येथील जैबुन्निसा अब्दुल रहेमान (वय ७१) यांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. रविवारी (ता. १५) सकाळी हात-पायांना सूज येऊन त्यांना त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.