धुळे ः टुडे १ साठी, संक्षिप्त
---
महिलेला दमदाटी;
चार जणांवर गुन्हा
धुळे : घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी, तसेच तिला व तिच्या पतीला दमदाटी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार धुळे शहरातील पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार १० नोव्हेंबरला दुपारी बाराला अमोल मराठे, नीरज मराठे, यश ढमढेरे (सर्व रा. नवनाथनगर) आणि विकास सुतार (रा. भोलेबाबानगर) हे चौघे संबंधित महिलेच्या घरात घुसले. त्यांनी महिलेचा विनयभंग केला, तसेच तिला व तिच्या पतीला शिवीगाळ करत दमदाटी केली. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार एस. डी. मोरे तपास करीत आहेत.
---
मारहाण केल्याने
चौघांविरुद्ध गुन्हा
धुळे : किरकोळ भांडणातून एकास लोखंडी रॉड व हॉकीस्टिकने मारहाण केल्याची घटना देवपूर परिसरात घडली. सतीश भास्कर चौधरी (वय ४१, रा. विट्टाभट्टी, देवपूर, धुळे) यांनी देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ८ नोव्हेंबरला रात्री साडेआठला देवपुरातील दुर्गामाता मंदिर, विट्टाभट्टी परिसरात हुकूम रमेश मराठे, बादशहा रमेश मराठे, मनोज महाजन आणि अप्पू या चौघांनी किरकोळ कारणावरून सतीश चौधरी या मजुराला हाताबुक्क्यांनी, तसेच लोखंडी रॉड व हॉकीस्टिकने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते तपास करीत आहेत.
---
डॉक्टरची दुचाकी
देवपुरातून लंपास
धुळे : शहरातील शिफा हॉस्पिटलजवळील हुडको कॉलनीत राहणाऱ्या एका डॉक्टरची दुचाकी चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोईन खान अय्युब खान (रा. हुडको कॉलनी) हे डॉक्टर असून, ८ नोव्हेंबरला दुपारी चार ते रात्री अकराच्या दरम्यान देवपुरातील शतायू हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये त्यांची पंधरा हजार किमतीची दुचाकी (एमपी ४६, एमसी ०१८८) उभी होती. चोरट्यांनी ही दुचाकी नेली. या प्रकरणी हवालदार सोनार तपास करीत आहेत.
---
घसरून पडल्याने
शेतकऱ्याचा मृत्यू
धुळे : शिंदखेडा तालुक्यात तापी नदीच्या पात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. योगेश पंढरीनाथ पाटील (वय ४५, रा. लघाणे, ता. शिंदखेडा) असे शेतकऱ्याचे नाव आहे. १० नोव्हेंबरला सकाळी आठला योगेश पाटील नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. दुपारी चारच्या सुमारास लोहगाव शिवारातील तापी नदीच्या पात्राजवळ असलेल्या पाण्याचा मोटारीचा स्टार्टर सुरू करत असताना त्यांचा पाय घसरला. तोल जाऊन ते तापी नदीत पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
---
कापडणेत आढळला
अनोळखी मृतदेह
धुळे ः सोनगीर पोलिस ठाणे हद्दीतील धमाणे ते कापडणे (ता. धुळे) रस्त्यालगत कापडणे शिवारातील गट क्रमांक १४२५ मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अंदाजे ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. १२ नोव्हेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह झाडावरून उतरवून हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत सोनगीर पोलिसांकडे नोंद झाली.