धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 31691
धुळे : जिल्हा रुग्णालयातील बंद असलेली सिटी स्कॅन सेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांना देताना सुनील बैसाणे.
--
जिल्हा रुग्णालयाची सिटी स्कॅन सेवा सुरू करा
--
सुनील बैसाणे यांची पालकमंत्री रावल यांच्याकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : जिल्हा शासकीय रुग्णालयातील गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली सिटी स्कॅन सेवा तत्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव तथा नगरसेवक सुनील बैसाणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले.
-
जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन बंद असल्यामुळे अपघातग्रस्त रुग्ण, डोक्याला गंभीर दुखापत झालेले रुग्ण, मेंदूतील रक्तस्राव आणि स्ट्रोकसारख्या तातडीच्या वैद्यकीय परिस्थितीमध्ये रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय सुविधा बंद असल्याने रुग्णांना खासगी निदान केंद्रांमध्ये जाऊन दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असून, यामुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मशिन चालवणाऱ्या संबंधित कंपनीचे प्रशासकीय किंवा तांत्रिक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे ही सेवा बंद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आरोग्यासारख्या अतिसंवेदनशील विषयावर कायमस्वरूपी आणि शाश्वत व्यवस्था उभी करणे गरजेचे असल्याचे सांगत, मशीनची दुरुस्ती करून किंवा नवीन मशीन तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, जोपर्यंत शासकीय सेवा पूर्ववत होत नाही तोपर्यंत गरीब रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय खर्चातून किंवा शासनमान्य दराने नजीकच्या खासगी निदान केंद्रात सिटी स्कॅनची तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.