धुळे : टुडे पान २ साठी... मेन
--
( आली दिवाळी लोगो क्रमांक : 34142)
फोटो क्रमांक : 34144, 34143, 34146
धुळे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आलेले आकाशकंदील पाहताना नागरिक. दुसऱ्या छायाचित्रात महापुरुषांसह देवी-देवतांच्या प्रतिमांचे आकाशकंदील. तर शेवटच्या छायाचित्रात विक्रीसाठी आलेले वेतापासून तयार केलेले पर्यावरणपूरक आकाशकंदील. (छायाचित्रे : गोरख गर्दे)
--
शहरातील बाजारपेठेत दिवाळीचा झगमगाट
--
पर्यावरणपूरक, देवी- देवतांच्या प्रतिमा अन् वेताच्या कंदीलांनी सजल्या बाजारपेठा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठा आकर्षक आकाशकंदील, विद्युत माळा आणि सजावटीच्या साहित्याने उज्जळून निघाल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांची चलती असून, पारंपरिक कलाकुसर, पर्यावरणपूरक साहित्याचा संगम असलेल्या आकाशकंदीलांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधले आहे. शहरातील फुलवाला चौक, साक्री रोड, देवपूर आणि दत्त मंदिर परिसरातील बाजारपेठा विविधरंगी आणि नक्षीदार कंदीलांनी फुलून गेल्या आहेत.
-
यंदा ग्राहकांचा कल टिकाऊ आणि पर्यावरणपूरक वस्तूंवर अधिक दिसून येत आहे. कापडी, कागदी, बांबू तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून तयार केलेल्या कंदीलांना नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय स्थानिक महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या आकाशकंदीलांनाही बाजारपेठेत मागणी आहे. यामुळे अनेक महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला असून, स्थानिक व्यावसायिकांमध्ये आणि बचत गटांच्या महिलांमध्येही मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
-
किंमतीत वाढ
कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि वाहतुकीचा अधिक खर्च यामुळे यंदा आकाशकंदीलांच्या दरात मागील वर्षांच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात हे कंदील १०० रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत विविध आकार आणि प्रकारात उपलब्ध आहेत. तीन इंच ते सहा फुटांपर्यंतच्या अष्टकोनी, पंचकोनी, डेरेदार तसेच ‘नॅनो’ कंदीलांची रेलचेल बाजारात आहे. दिवाळीच्या सजावट साहित्याच्या खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. दर वाढले असले तरी शहरवासीयांच्या खरेदीच्या उत्साहात कोणतीही घट झालेली नाही.
-
१४-१
..चौकट..
१४-१
सांस्कृतिक संकल्पनांचे कंदील
यंदाच्या बाजारात धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पनांवर आधारित आकाशकंदीलांना विशेष प्राधान्य मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, राधे- कृष्ण, गणपती बाप्पा, विठ्ठल-रुखमाई, खाटू श्याम महाराज, महादेव आणि श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमा असलेले कंदील बाजारपेठेत दाखल झाले आहेत. कंदीलांच्या चारही बाजूंना असलेल्या या आकर्षक प्रतिमा रात्रीच्या रोषणाईत अधिक उठून दिसतात. तसेच पारंपारिक कागद आणि प्लास्टिकच्या पट्ट्यांव्यतिरिक्त यंदा वेतापासून बनवलेले चौकोनी, षटकोनी आणि डेरेदार आकारांचे कंदील बाजारात आले आहेत, ज्यांच्या रंगसंगतीने ग्राहकांना भुरळ घातली आहे.
-