धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 35059
धुळे : दिवाळीनिमित्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वितरण करताना लताबाई पोद्दार. शेजारी दिनेश पोद्दार, पूनम शिरसाट, प्रदीप बैरागी, लक्ष्मण पाटील, संदीप मोरे आदी.
---
धुळ्यात ६२ स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
स्थायी समिती सभापती लताबाई पोद्दार व युवा फाउंडेशनचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मेहनत करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. मनपा स्थायी समिती सभापती लताबाई यशवंत पोद्दार आणि युवा फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पोद्दार यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक नऊमधील जय मल्हार नगर येथे कार्यक्रम पार पडला.
ऊन, वारा, व पावसाची कोणतीही तमा न बाळगता आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या आणि शहराचे आरोग्य टिकवून ठेवणाऱ्या प्रभाग नऊ मधील ६२ महिला व पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल या कार्यक्रमात घेण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली. प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला पैठणी साडी व मिठाई, तर पुरुष कर्मचाऱ्यांना ड्रेस आणि मिठाई भेट देण्यात आली. सभापती पोद्दार, नगरसेविका पूनम शिरसाट, नगरसेवक प्रदीप बैरागी यांच्या हस्ते या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, आरोग्य निरीक्षक संदीप मोरे उपस्थित होते. युवा फाउंडेशनचे अध्यक्ष पोद्दार यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टांचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील या घटकाप्रति कृतज्ञता व्यक्त करणे ही नैतिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. निनाद पाटील, अजय पवार, दीपक कोळी, हरीश सोनार, तुषार जाधव, भय्या खैरनार, भरत पाटील, मनोज सोनार, यशोधन पाटील, सोनू, ज्योती, सुनील बिरारी, रंजीत बच्छाव, महेश केले आदींनी संयोजन केले.