धुळे : टुडे पान २ साठी...मेन
---
यंदा रेशन दुकानातून आनंदाचा शिधा गायब
लाभार्थी वंचित; दुष्काळाच्या सावटात शासनाकडून निराशा, लाभार्थ्यांची नाराजी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि गोडधोडाचा सण. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील गरजू कुटुंबांची यंदाची दिवाळी निराशेच्या सावटात गेली. प्रमुख सणांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अत्यल्प दरात किंवा शंभर रुपयांत मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ यंदा रेशन दुकानांतून उपलब्ध न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा समावेश असलेला आनंदाचा शिधा वितरित केला जात असे. यामुळे सणाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होईल, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा होती. मात्र यंदा दिवाळीत यासंदर्भात शासनाकडून कोणताही अधिकृत निर्णय न झाल्याने हा शिधा मिळू शकलेला नाही. जिल्ह्यात या वर्षी सर्वच तालुके दुष्काळी जाहीर झालेले असताना ऐन सणाच्या काळात शासनाच्या या उदासीन धोरणामुळे गोरगरीब कार्डधारकांची दिवाळी गोड होऊ शकली नाही.
अन्नधान्य वाटप सुरू
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत चारही तालुक्यांमध्ये ९८७ रेशन दुकाने कार्यरत आहेत. जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत तीन लाख २१ हजार ५०८ शिधापत्रिकाधारक असून, १४ लाख ३२ हजार २५५ इतके लाभार्थी आहेत. एका बाजूला सणासाठी मिळणाऱ्या विशेष आनंदाचा शिध्यापासून नागरिक वंचित राहिले असले तरी दुसऱ्या बाजूला नोव्हेंबर २०२६ करिता नियमित अन्नधान्य आणि साडीचे वाटप सुरू ठेवण्यात आले होते. असे असले तरी दुष्काळी परिस्थिती, शेतीमाला झालेले नुकसान आणि वाढती महागाई यामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना शासनाच्या आनंदाच्या शिध्याची गरज होती. नियमित अन्नधान्य वाटप सुरू असले तरी आनंदाचा शिधा न मिळाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
---
चौकट
जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक
तालुका ------- दुकाने -------------- शिधापत्रिकाधारक ----------- लाभार्थी
धुळे ----------- २९६ ----------------- १,१६,८९९ ----------------- ५,१५,६३५
साक्री --------- ३०३ ----------------- ७७,२९९ ------------------- ३,७१,२४२
शिंदखेडा ------ १८२ ---------------- ५८,७७१ -------------------- २,३८,२९२
शिरपूर -------- २०६ ----------------- ६८,५३९ ------------------- ३,०७,०५६
एकूण --------- ९८७ ----------------- ३,२१,५०८ ---------------- १४,३२,२२५